Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मैदानावरुन मालेगांवचे राजकारण तापणार; ईदगाह मैदानाच्या जागेसाठी भाजपचे धरणे आंदोलन..

दि . 10/03/2022

ऑनलाईन गदारोळात ठराव केल्याचा भाजपचा आरोप..

मालेगाव शहरातील पोलीस परेड मैदानावरील राखीव जागा ईदगाह ट्रस्टला नाममात्र कराराने देण्याचा ठराव मनपाच्या  महासभेत मंजूर करण्यात आला. या ठरावाला भाजपाने सुरुवातीपासून विरोध दर्शवित भाजपच्या नगरसेवकांनी थेट मैदानातून महासभेला उपस्थिती दर्शविली होती. मात्र तरीदेखील मंजूर करण्यात आलेला ठराव विखंडीत करण्यासाठी भाजपचे गटनेता सुनील गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाजवळ  गायकवाड यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदरच्या मैदानावरील काही जागा ही गेल्या सहा दशकांपासून एका शिक्षण संस्थेला नाममात्र दराने दिलेली आहे. तसेच याठिकाणी पोलीस परेड मैदान देखील असून काही जागा ही ईदगाह ट्रस्टकडे देखील आहे. असे असतांना गेल्या सहा दशकांपासून सगळे सुरुळीतपणे सुरु आहे. याठिकाणी अनेक धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम घेतले जातात. तसेच मुस्लिम समाजबांधव देखील रमजान ईद, बकरीईद आदी सणांवेळी याठिकाणी येवून सामुहिक नमाज पठण करतात. यात कुठलीही अडचण येत नसतांना काही लोकप्रतिनिधी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन ही समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने जागेवरुन राजकारण करीत आहेत. मैदानाचे आरक्षण आहे तसेच ठेवणे योग्य असून मनपा महासभेत महापौर यांनी ऑनलाईन गोंधळात सत्तेचा दुरपयोग करीत ठराव मंजूर करुन घेतला आहे. त्या ठरावाला विखंडीत करावा, अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे. मैदानावरुन सुरु झालेले राजकारण आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले जात असल्याचा आरोप देखील निवेदनात करण्यात आला आहे.
यावेळी भाजपचे गटनेता सुनील गायकवाड यांच्यासह मदन गायकवाड, निलेश कचवे, संदीप पाटील, नितीन पोफळे, दादा जाधव, पवन ठकरे, विष्णू देसाई, विवेक वारुळे, अरुण पाटील, मुन्ना अहिरे, लकी गिल यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

------------------
मालेगाव महापालिकेची आगामी पंचवार्षिक निवडणुक डोळ्यासमोर ठेवून दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी मालेगाव बाह्य तसेच मालेगाव मध्य चे आमदार, महापौर, उपमहापौर आदी पदाधिकारी मैदानाचे राजकारण करीत आहेत. जागा ईदगाह ट्रस्टकडे गेली तर भविष्यात याचे दुष्परिणाम होवू शकताता. इतर धार्मिक कार्यक्रमांना मज्जाव केला जावू शकतो. यामुळे मालेगाव शहरातील जनतेचे मोठ्याप्रमाणात नुकसान होणार असल्याची खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.


ताज्या बातम्या