Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अपहरण करून २८ हजारांची लूट तर एका व्यवसायिकांच्या गोडाऊन मधून २१ लाखांची चोरी; वाढत्या गुन्हेगारीने मालेगावकर हैराण..

दि . 09/03/2022

मालेगाव : शहरात वाढती गुन्हेगारीने नागरिक हैराण झाले आहेत. भर दिवसा लुटमार सुरु झाल्याचे प्रकार दिवसागणिक वाढत चालले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात गेल्या दोन दिवसात दोन व्यावसायिकांवर लुटल्याची घटना घडली. यात एका लुम कारखानदाराचे अपहरण करुन त्याला चाकुचा धाक दाखवित २८ हजारांना लुटले असनू दुसऱ्या घटनेत गॅरेज व्यावसायिकाच्या ऑफिसमधून २१ लाखांची रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. पहिल्या घटनेत पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून दुसऱ्या घटनेतील गुन्हेगारांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी आयशानगर आणि मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पहिल्या घटनेत लुम कारखानदार एजाज अहमद खुर्शिद अहमद (वय ५२, रा. इस्लामपुरा) हे रस्त्याने जात असतांना दोन दुचाकीवरुन आलेल्या पाच संशयितांना चाकुचा धाक दाखवित त्यांचे अपहरण केले. एजाज अहमद यांच्या खिश्यातील तीन हजार रुपयांची रोकड व ए.टी.एम.च्या माध्यमातून २५ हजारांची रोकड काढली. अपहरण केलेल्या एजाज अहमद यांना पुन्हा शहरातील साठ फुटी रोडवर सोडून दिले. ७ मार्च रोजी हा प्रकार घडला असून याप्रकरणी त्यांनी आयशानगर पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध फिर्याद दिली. लुम कारखानदाराला २८ हजारांना लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी कसून शोध घेतला असून याप्रकरणी नदीम अहमद शकील अहमद (वय २२, रा. अबुबकर सिद्धीकी नगर, मालेगाव) याला बुधवारी (दि.९) रोजी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लवकरच अन्य गुन्हेगारांचा देखील शोध घेवून त्यांना बेड्या ठोकण्यात येतील अशी माहिती पोलिसांनी दिली असून याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एम.जी. पवार तपास करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत जमील अहमद शेख अब्दुल्ला (वय ४५, रा. आझादनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीच्या गॅरेज मधील ऑफिसमध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन लॉकरमधील २१ लाख १३ हजार ६३० रुपयांची रोकड चोरुन नेली आहे. ४ मार्च रोजी ही घटना घडली असून हिशोब लागत नसल्याने ही घटना उघड झाली. जमील अहमद यांनी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात जावून याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक शैले पाटील तपास करीत आहेत.


ताज्या बातम्या