Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




युक्रेनमध्ये रशियाचा जाळ; मालेगावमध्ये महागाईचा बार, गोडेतेल 20 रुपयांनी भडकले

दि . 03/03/2022

मालेगावः आक्रमतेबाबत हिटलरच्या पंक्तीत जावून बसण्याचे कृत्य करणाऱ्या रशियाच्या (Russia) पुतीनने युक्रेनमध्ये (Ukraine) जाळ निर्माण केलाय. बहुतांश देशांच्या इशाऱ्याला न जुमानता त्यांनी आपले आक्रमण सुरूच ठेवले आहे. जग तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करत आहे का, अशी भीती जागतिक तज्ज्ञ व्यक्त करतायत. त्याचे काय परिणाम होणार, याची चिंता साऱ्यांना लागलीय. मात्र, तूर्तास तरी या युद्धाने (war) नाशिक, मालेगावसह महाराष्ट्रात महागाईचा बार उडवल्याचे समोर येत आहे. एकीकडे निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे गोडेतेलाच्या किमतीत सध्याच लिटरमागे 20 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

साठेबाजी केल्यास कारवाई

युक्रेन-रशिया युद्धाचा फायदा घेण्याचा प्रयत्न अनेक व्यापारी करत आहेत. अनेकांनी तेलाची साठेबाजी सुरू केल्याचे समजते. त्यामुळे बाजारपेठेत तेलाची मागणी जास्त आणि पुरवठा कमी, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. असे झाले तर येणाऱ्या काळात गोडेतेलाचे भाव अजून वाढतील. त्यामुळे कोणही साठेबाजी करू नये, असे आवाहन मालेगावचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी केले आहे. साठेबाजी रोखण्यासाठी पथकांची स्थापना करून कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

इंधन भडकण्याची भीती

दरम्यान, युक्रेन-रशिया युद्धामुळे एकीकडे सोने महाग होत आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोन्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकाचा निकाल मार्च महिन्यात आहे. या निकालाची घोषणा झाल्यानंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसे झाले, तर पुन्हा महागाई भडकेल. याचा फटका सर्वसामान्यांना बसेल.


ताज्या बातम्या