Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सामान्य रुग्णालयातील रिक्त पदे, संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिकेची तयारी काय?- याचिकाकर्ते राकेश भामरे यांचा प्रशासनाला सवाल..

दि . 07/08/2021

मालेगाव - करोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदांचा प्रश्न गंभीर असून याची दखल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतली आहे. ६८ रिक्त पदांच्या भरतीप्रक्रियेत बिंदूनामावलीस मान्यता मिळणे महत्वाचे असल्याने गमे यांनी बिंदूनामावलीस मान्यता दिल्याचे मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी मटाशी बोलताना सांगितले. शहरातील आरोग्य व्यवस्थेबाबत मनसे शहराध्यक्ष राकेश भामरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायालयीन आदेशानुसार गठीत समितीची १४ वी आढावा बैठक शुक्रवारी (दि.०६) ऑनलाइन पार पडली. यावेळी भामरे यांनी मनपातील आरोग्य विभागातील रिक्त पदांचा विषय निदर्शनास आणून दिला. बिंदूनामावलीस विभागीय आयुक्तांची मान्यता मिळाल्याने रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लागण्यास वेग येणार आहे. 

 

येथील प्रांताधिकारी कार्यालयात ही आढावा बैठक झाली यावेळी आयुक्त भालचंद्र गोसावी, प्रांत डॉ. विजयानंद शर्मा, आरोग्य अधिकारी डॉ. दुसाने, डॉ. हितेश महाले, अस्लम अन्सारी, याचिकाकर्ते राकेश भामरे आदी उपस्थित होते. शहरातील आरोग्य समस्याबाबत भामरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने याप्रश्नी समिती गठीत केली असून या समितीद्वारे दर दोन महिन्यांनी शहरातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला जातो. शुक्रवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीत विभागीय आयुक्त गमे यांनी रिक्त पदे, संभाव्य तिस-या लाटेची पूर्वतयारी, ऑक्सिजन प्रकल्प, लसीकरण अशा विविध विषयांवर आढावा घेतला. याचिकाकर्ते भामरे यांनी मनपा तसेच सामान्य रुग्णालयातील रिक्त पदे, संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिकेची तयारी काय?, मनपात शासन नियुक्त आरोग्य अधिकारी असावा असे मुद्दे उपस्थित केले. 

यावेळी गमे यांनी रिक्त पदांच्या भर्ती प्रक्रियेसाठी बिंदूनामावलीस तत्काळ मान्यता दिली जाईल असे स्पष्ट केले. तसेच पालिकेने तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान बालकांसाठी कोविड सेंटर, ऑक्सिजन प्रकल्प, स्वेब चाचणी केंद्र यांची सज्जता ठेवण्याचा सूचना केल्यात. लसीकरणाबाबत पूर्व भागातील उदासीनता लक्षात घेता मौलाना, नगरसेवकांची बैठक घेणे, त्यांचे लसीकरण करून लोकांमध्ये जनजागृतीवर भर देण्याच्या देखील सूचना केल्यात. यासह पुढील आढावा बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य उपसंचालक यांना सामील करून घ्यावे. प्रत्यक्ष बैठकीचे आयोजन करावे अशी सूचना केली. आयुक्त गोसावी यांनी ६८ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाईल. ऑक्सिजन प्रकल्पासाठी कार्यादेश दिला असून कामास गती मिळाली असल्याचे गोसावी यांनी सांगितले.