Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नांदगांव : कोरोना वाढतोय ; पण आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर

दि . 18/03/2021

नांदगांव ( प्रतिनिधी )  तालुक्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असतांना प्रशासकीय यंत्रणा मात्र हे गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत अशी परिस्थिती आज आमदार सुहास कांदे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत दिसून आली..नांदगांव व मनमाड शहरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नाही, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केल्यास रुग्ण ठेवण्यास कोविड केअर सेंटर नाही, मनमाड शहरात स्वॅब घेण्यास अनियमितता, कंटेन्मेंट झोन नाही,  एका बाधित व्यक्तिमागे किमान ३० लोकांचे ट्रेसिंग होणे गरजेचे आहे मात्र त्याचेही प्रमाण नगण्य म्हणजेच नाहीच्या बरोबर अशी दयनीय अवस्था नांदगांव तालुक्यातील यंत्रणेची असल्याने आरोग्य यंत्रणाच  व्हेंटिलेटर  वर असल्याचे चित्र आजच्या बैठकीत दिसून आले..पुढील आठ दिवसात यंत्रणेत सुधार व्हावा अशी तंबी आमदार सुहास कांदे यांनी आरोग्य यंत्रणांची अशी  अवस्था  बघितल्यानंतर दिली..यावर कार्यवाही अपेक्षित असल्याच्या सूचना देत पुन्हा आठ दिवसांनी बैठक घेण्यात येईल असेही आमदार कांदे यांनी सांगितले..या बैठकीस 

जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर, प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार उदय कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी अशोक ससाणे,गटविकास अधिकारी गणेश चौधरी, मनमाड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गोविंद नरवणे, नांदगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रोहन बोरसे, पोलीस निरीक्षक अनिल कातकाड़े, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते आदी या बैठकीस उपस्थित होते..दररोज स्वॅब टेस्टिंग करण्यात यावी.कोरोना बाधित रुग्णांच्या घरी जाऊन रुग्ण तपासणी करण्यात यावी त्यांच्यामागील हाय रिस्क, लो रिस्क रुग्णांची तपासणी करण्यात यावी.जे बाधित रुग्ण घराबाहेर फिरत असतील त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात यावे आदी सूचना या बैठकीत प्रांताधिकारी यांनी दिल्या..दरम्यान, जे रुग्ण कोरोना संसर्ग

बाधित आहेत त्यांच्यामागील प्रत्येकी ३० जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून स्वॅब घेण्यात येऊन पुढील तीन दिवसांत त्याचे अहवाल सादर करण्यात यावे..शहरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी  शिक्षकांची मदत घ्यावी तर ग्रामीण भागातील छोट्या आस्थापना यांची तपासणी करतांना ग्रामसेवक तलाठी यांची मदत घेण्यात यावी अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या..हे करण्यास जे विरोध दर्शवतील त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करा असे निर्देशही या बैठकीत देण्यात आले..तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणांनी एकमेकांच्या संपर्कात राहून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कसा रोखण्यात येईल याकडे लक्ष देणे गरजेचे असून कामात हयगय करू नका अशी तंबी या बैठकीत आमदार सुहास कांदे यांनी दिली..

 

 - सव्वा लाख लोकवस्ती असलेल्या मनमाड शहरात आरोग्य यंत्रणा मात्र गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आजच्या बैठकीत दिसून आले.दररोज स्वॅब टेस्टिंग महत्वाची असतांना हप्त्यातून केवळ दोन किंवा तीन दिवस स्वॅब घेतले जात असल्याची तक्रार या बैठकीत पुढे आली.तसेच मनमाड शहरात डिसीएचसी सेंटर उभारण्यात यावे अशी मागणी या बैठकीत पुढे आली.नांदगाव शहराप्रमाणे मनमाड शहरात देखील स्वॅब टेस्टिंग वाढविण्यात यावे अशा सूचना या बैठकीत आमदार कांदे यांनी दिल्या..