Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
देवळा तालुक्यातील गावठाण जागेची ड्रोन द्वारे मोजणी

दि . 12/01/2021

देवळा : राज्य शासनाने प्रत्येक गावातील गावठाण जागेची मोजणी करण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने देवळा तालुक्यातील २३ गावांतील गावठाण जागेची मोजणी करण्याचे काम देवळा भूमी अभिलेख कार्यलयाकडून सुरू करण्यात आले आहे.
 

भूमी अभिलेख नाशिक जिल्हा अधीक्षक महेश शिंदे, देवळा तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ,देवळा भूमी अभिलेख उपअधीक्षक सुभाष गावित, गटविकास अधिकारी राजेश देशमुख,सटाणा उपअधीक्षक राहुल पाटील,मुख्यालय सहाय्यक प्रशांत आडांगळे यांच्या उपस्थितीत सोमवार दि.११ रोजी खामखेडा गावाच्या गावठाण जागेची ड्रोन कॅमेयाद्वारे मोजणी करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.गावठाण जागेची मोजणीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गावातील प्रत्येक घरमालकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड (पीआर कार्ड) तयार होणार असून या योजनेत सर्व गावांचे गावठाण भूमापन करून मिळकतिचे सनद स्वरूपात अभिलेख शासकीय स्तरावर तयार केले जाणार
आहे. मोजणीसाठी ६ पथके तयार करण्यात आले असून एका पथकाकडे ४ गावे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये गावठाण हद्द निश्चित करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व सरपंच त्यांच्या मदतीला असणार आहेत. या मोजणीमध्ये गावातील अंतर्गत रस्ते, घर तसेच मोकळ्या जागेचे नकाशे तयार केले जाणार आहेत. तसेच प्रॉपर्टी कार्ड तयार करून ग्रामस्थांना दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नाशिक महेश शिंदे आणि देवळा तालुका उपअधीक्षक, सुभाष गावित यांनी दिली.

• या गावांचा समावेश
 

खामखेडा, कांचणे, भावडे, कुंभार्डे, वाजगाव, वडाळे, वहाळे, सावकी, कनकापूर, खडकतळे, सांगवी, वरवंडी, शेरी, भिलवाड, चिंचवे, विठेवाडी, वार्शी, देवपुरपाडे, गिरणारे, मटाणे, हनुमंतपाडा, कापशी, डोंगरगाव या २३ गावांचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे गावठाण जागेची मोजणी करण्यात येणार आहे.

• ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढण्यास होणार मदत

ग्रामपंचायतीकडे गावठाणांचे अभिलेख उपलब्ध नसल्याने आपली नेमकी किती जागा आहे, याची माहिती ग्रा.पं.ला नाही. मालमत्तांचे मालकीपत्र नसल्यानेही ग्रामस्थांना यामध्ये गृहकर्ज, बँक तारण किंवा कर्ज मिळत नाही. गावठाण मोजणीनंतर प्रत्येक गावातील नदी-ओढे, शेत रस्ते यांचीही माहिती मिळणार आहे.त्याचबरोबर प्रत्येक ग्रामपंचायतला मालमत्ता कर हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. वाढत्या नागरीकरणाच्या प्रमाणात कराच्या उत्पन्नात वाढ झाली नाही. कारण आतापर्यंत ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मिळकती व मालमत्तांची गणना झालेली नाही. तसेच या मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन झालेले नाही. ग्रामपंचायतींना त्यांच्या हद्दीत बांधकामांना परवानगी देण्याचे अधिकार राज्य सरकारकडून देण्यात आले. परंतु, अनेक ग्रामपंचायतींकडे हद्दीचे नकाशेच उपलब्ध नाहीत. आता मात्र गावठाणांचे भूमापन झाल्यानंतर सर्व माहिती ग्रामपंचायतींना मिळणार असून ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.