Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
दहिदी शिवारात नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू

दि . 01/12/2020

मालेगाव - तालुक्यातील दहीदी-गरबड रस्त्यावरील शिवनाला परिसरात एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवार दि. २८ रोजी सायंकाळी उशिरा वनविभागाच्या अधिका-यांनी या मृत बिबट्याचे त्या परिसरात दहन केले. दहीदी परिसरात मोठे जंगल असून वनविभागाचे कर्मचारी या परिसरात गस्त घालत असतांना नाल्यानजीक अंदाजे ८ वर्षाचा नर बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.डी. कांबळे यांना देण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकारी जावेद खाटिक, अधिकारी कांबळे व वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर मृत बिबट्याच्या शरीराचे केवळ अवशेष शिल्लक असल्याचे आढळून आले. सात ते आठ दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असावा असे वनाधिकारी कांबळे यांनी सांगितले. मृत अवस्थेतील बिबट्याचे शनिवारी रात्री उशिरा तेथेच दहन करण्यात आले. बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. परंतु उपासमारीने बिबट्या मृत झाला असल्याची शक्यता अधिका-यांनी व्यक्त केली. यावेळी वनविभागाचे परिमंडळ अधिकारी, वनरक्षक, वनमजूर हजर होते.