Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
करोनाच्या उपचारासाठी फुकट जागा उपलब्ध असतांना देखील लाखोंच्या भाड्याने इमारती देण्या-घेण्याचे तात्काळ थांबवा-राकेश भामरे..

दि . 22/05/2020

मालेगाव  : शहरातील करोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या रुग्णालये व सेवा केंद्रांसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात फुकट जागा उपलब्ध असतांना देखील लाखोंच्या भाड्याने इमारती देण्या-घेण्याचे बलुतेदारीचे (वसुलेगिरी) उद्योग तात्काळ थांबविण्यात यावे, अन्यथा पुराव्यासह यांचे गोरखधंदे जगजाहीर करण्यात येतील, असा इशारा मनसे शहराध्यक्ष राकेश भामरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.

करोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे, या संकट काळात काही लोक जीवाची बाजी लावून काम करून दिवसरात्र मेहनत घेत आहेत, तर हीच आपत्ती काहींसाठी इष्टापत्ती ठरली. राजकीय वजन वापरून तथाकथित ‘व्हाइट कॉलर’ फेम उखळ पांढरं करण्याचे उद्योग करत आहेत. खाटा खरेदी, आणि ऑक्सिजन सिलेंडर पळवापळवी जगजाहीर झाल्यावर यात नेमके कोणाचे हात काळे झालेत? हे मालेगावकर जनतेला वेगळे सांगण्याची गरज नाही. पण लोकसेवेच्या नावाखाली भ्रष्टाचार करणाऱ्यांना ही लाज नाही की आता प्रसंग कोणता आहे? शहरातून ग्रामीण भागात संसर्ग पोहोचला, सर्वत्र भयाण वातावरण आहे. लोकांना जीवाची चिंता भेडसावत असतांना काहींनी भविष्याचे इमले उभे करण्याची उठाठेव सुरू केलीय. सूचक मौन बाळगून अधिकारी वर्गाला दबावतंत्रात घेत मलई खाण्याचे उद्योग सुरू केले आहेत, त्यामुळेच येथे चांगले अधिकारी काम करण्यास नाखूष आहेत.

मालेगाव शहरात करोना रुग्णांसाठी आयत्यावेळी सुरू झालेले दवाखाने व सेवा केंद्रे यांच्यातून एका मोठ्या भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहू लागली आहे, करोना बाधित रुग्णांसाठी सरकारी व निमसरकारी भरपूर इमारती व जागा उपलब्ध आहेत, मात्र त्याऐवजी खासगी इमारती घेण्यास भाग पाडले जात आहे.  कारण त्यातून मिळणारे लाखोंचे “सरकारी भाडे” खुणावतेय. म्हणूनच शहरातील अनेक दिग्गज संस्थाचालकांनी आपल्या भव्य शैक्षणिक इमारती करोनाच्या रुग्णांसाठी जाहीरपणे मोफत देऊ केल्या असतांना त्या इमारती ताब्यात न घेता राजकीय बगलबच्च्यांना पोसण्याचे उद्योग कुणी ‘गुपचूप’ चालवित आहे? करोना सेंटरच्या नावाखाली खासगी इमारती, मनपा आणि जिल्हा प्रशासनाला दबाव टाकून घेण्यास भाग पाडले जात आहे, पडद्याआड ‘भाडे कमाई’ आणि जाहीररीत्या मात्र जनसेवेचे सोंग चांगलेच वठलेय!

खरे तर करोनाच्या विरोधात लढाई ही राजकिय चढाओढ बाजूला ठेवून लढावी लागणार आहे, मात्र ज्यांना या शहराने शिरावर घेतले तेच करोनाच्या आडून कार्यकर्ते पोसत आहेत, कॅम्प परिसरात अनेक संकुलांपैकी अवघ्या एका संकुलात तब्बल दोन हजार रुग्णांना ऍडमिट करता येऊ शकतात, त्यासाठी सुरक्षित इमारत व परिसर मिळत असतांना अन्य जागा घेण्याचे प्रयोजन काय? त्यावरून श्रेयवाद आणि उखळ पांढरं करण्याचा हा उद्योग नव्हे का?

शहराच्या मध्यवर्ती भागात फुकट जागा उपलब्ध असतांना लाखोंच्या भाड्याने इमारती देण्या-घेण्याचे ‘बलुतेदारीचे (वसुलेगिरी) उद्योग, तात्काळ थांबवा, मालेगावची जनता हे नसते उद्योग कोण करत आहे, हे चांगलं जाणून आहे. यांना आवर घाला, करोनाच्या लढाईतील शिलेदारांना बदनाम करण्याचे उद्योग बंद करा, अन्यथा पुराव्यासह यांचे गोरखधंदे जगजाहीर करण्यात येतील असा इशारा मालेगाव  मनसे शहराध्यक्ष राकेश भामरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिला आहे.

 


ताज्या बातम्या