Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
रावळगांव, लोणवाडे व चंदनपुरीला प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित - उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा

दि . 21/05/2020

​​मालेगाव, दि. 21 (उमाका वृत्तसेवा): वैद्यकीय अधिकारी यांच्या अहवालानुसार मौजे रावळगाव, लोणवाडे व चंदनपुरी शिवारातील मडकी महादेव वस्तीच्या परिसरातील कोरोना संसर्ग संशयित रुग्ण, वैद्यकीय प्रयोगशाळा चाचणी अहवालानुसार कोरोना विषाणू (कोव्हीड-19) लागण सिध्द (POSITIVE) झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचना नुसार तातडीने करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने सदर परिसर हा प्रतिबंधीत क्षेत्र (CONTAINMENT AREA) म्हणून घोषीत करण्यात आल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा यांनी पारित केले आहेत.

कोरोना विषाणू (कोव्हीड-19) लागण सिध्द झालेले रुग्ण ज्या ठिकाणी राहतात ते ठिकाण केंद्र बिंदू (EPICENTER) घोषित करून त्यापासून 1 किलोमीटर अंतरातील परिघाचे क्षेत्र हे प्रतिबंधीत क्षेत्र (CONTAINMENT AREA) म्हणून घोषित करणेत येत आहे. तर त्यास लागून 3 किलामीटर परिघातील क्षेत्र हे बफर झोन म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद कले आहे.

कंटेनमेंट क्षेत्रात पूर्णपणे संचारबंदी लागू राहील. या क्षेत्रात प्रवेश आणि निर्गमन करण्यास बंदी असेल. मात्र, अत्यावश्यक सेवेची दुकाने/ आस्थापना जसे किराणा दुकाने, भाजीपाला, दवाखाने, मेडिकल, दुध डेअरी यांना निर्धारित करून दिलेल्या वेळेत मुभा राहील. याठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे सुरक्षित अंतर पाळणे आवश्यक राहील. या परिसरातील नागरिकांनी सुरक्षेसाठी मास्कचा वापर बंधनकारक राहील. असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कंटेनमेंट क्षेत्रातील सर्व घरांचे सर्व्हेक्षण निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासह चेक पोस्ट एक्झिट पॉईंटवर आरोग्य क्षेत्रातील पथकाव्दारे सातत्याने तपासणी करण्यात यावी. नियुक्त करण्यात आलेल्या क्षेत्रीय आरोग्य कर्मचाऱ्यांनी या क्षेत्रातील घरांना भेटी देवून अहवाल विहीत नमुन्यात ISDP नोडल अधिकाऱ्यांना सादर करावा. कोव्हीड-19 संसर्गाच्या संभाव्य लक्षणांबद्दल शिघ्र प्रतिसाद पथक (आरआरटी) यांना कळवावा. लागण सिध्द (POSITIVE) रुग्णांचे संपर्कात आलेल्या सहवासित व्यक्तींचा तात्काळ शोध घेवून वैद्यकीय पथकाच्या निर्देशाप्रमाणे होम, इन्स्टीट्युशनल क्वारंटाईनची आणि इतर वैद्यकीय कार्यवाही तातडीने करण्यात यावी. संक्रमणाचा (INFECTION) पुढील प्रसार रोखण्यासाठी वैद्यकीय पथकांच्या निर्देशांचे पालन करावे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेव्दारे या परिसरातील संपूर्ण स्वच्छता करुन अहवाल सादर करावा. नियुक्त करण्यात आलेल्या चेकपोस्टसह संबंधित पथकातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कामकाज करतांना वैयक्तिक सुरक्षा उपकरणे आणि शासनाच्या आरोग्य विभागाचे मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. अशा सुचनाही या आदेशात नमूद करण्यात आल्या आहेत.

 


ताज्या बातम्या