Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मोठी बातमी ! काँग्रेसने अट्टहास सोडला; विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार

दि . 11/05/2020

मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषद निवडणुकीविषयी जो राजकीय पेच निर्माण झाला होता. तो पेच आता सुटला असल्याची माहिती मिळत आहे. विधानपरिषद निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. निवडणूकीत कॉंग्रेस एक जागा लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आता महाविकासआघाडी 5 जागा तर भाजप 4 जागांवर निवडणूक लढवण्यास तयार असल्यानं विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. विधानपरिषदेच्या निवडणूकीसंदर्भात महाविकासआघाडीत एक बैठक आज पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपने 4 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तसंच शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जणांना उमेदवारी दिली आहे.

भाजपकडून प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेने उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची नावं निश्चित केली आहेत. शिवसेनेने ही दोन्ही नावं निश्चित केली असली, तरी त्यांची अधिकृत घोषणा मात्र अजून झालेली नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देणार असल्याचा चर्चा आहेत. विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. 11 मे हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, तर 14 मेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.


ताज्या बातम्या