Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




औरंगाबाद | रेल्वे रुळावर झोपलेल्या 16 परप्रांतीय मजुरांचा चिरडून दुर्दैवी अंत, करमाड येथील घटना

दि . 08/05/2020

औरंगाबाद:- औरंगाबादमधील करमाड येथे 16 मजूर रेल्वेखाली आल्याने जागीच ठार झाले आहेत. औरंगाबाद-जालना रेल्वे लाईनवर करमाड शिवारात परराज्यातील 17 मजूर मध्यप्रदेशात निघाले होते. यामधील 16 मजूर जागीच ठार झाले आहेत. तर 1 जण गंभीर जखमी आहे. हे मजूर रेल्वे रुळावर झापलेले होते. दरम्यान मालगाडी खाली चिरडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. आज सकाळी पाच ते सहा वाजेदरम्यान ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
लॉकडाऊनमुळे जालन्यात अडकलेले मजूर रेल्वे रुळावरुन औरंगाबादच्या दिशेने पायी येत होते. दरम्यान रात्री थकल्यावर रेल्वे बंद असल्याचा विचार करुन मजुरांनी रुळावरच झोप घेतली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे परप्रांतीय मजूर मध्य प्रदेशातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. करमाड पोलीस दुर्घटनास्थळी अधिक तपास करत आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान परराज्यातील अनेक मजूर महाराष्ट्रात अडकलेले आहे. त्यांना बस आणि विशेष ट्रेनच्या माध्यमातून आपापल्या गावी नेण्याची व्यवस्था केली जात आहे. यासाठी अनेक रेल्वेगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र याच काळात औरंगाबादेतून ही दुर्दैवी घटना समोर आली.


ताज्या बातम्या