Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त कामी पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांची मालेगावात नियुक्ती..

दि . 05/05/2020

मालेगाव :- शहरात करोनाचे थैमान रोखण्यासाठी शासन व प्रशासकीय पातळीवरून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. विशेषतः या कालावधीत महापालिका व महसूल विभागात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून अनेक अधिकारी नव्याने नियुक्त करण्यात आले आहे. पोलीस दलात देखील आता नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची करोनाच्या पार्श्वभूमीवर मालेगावी कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त कामी नियुक्ती करण्यात आली आहे. 

करोनाच्या पार्श्वभूमीवर येथील प्रशासनात अनेक बदल्या व नियुक्त्या आतापर्यंत झाल्या होत्या. मात्र पोलीस दलात अद्याप कोणतेही फेरबदल झाले नव्हते. सुनील कडासने यांनी या आधी मालेगाव शहरात सेवा बजावली आहे. त्यांच्या कार्यकाळात शहरातील मुस्लीम समुदायात त्यांनी चांगली प्रतिमा निर्माण केली होती. उर्दू भाषेची देखील त्यांना जाण असल्याने शहरातील सलोखा राखण्यात त्यांना यश आले होते. शहरात करोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी पोलीस यंत्रणा सध्या तैनात आहे. परंतु अनेकवेळा स्थानिक व पोलीस कर्मचारी यांच्यात वादाचे प्रसंग घडल्याचे समोर आले आहे. यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी करोनाबाधित होत आहेत. या पार्श्वभूमीवर सुनील कडासने यांची मालेगावात नियुक्ती होणे महत्वाचे मानले जाते आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व कडासने यांच्यात मालेगावातील स्थिती बाबत चर्चा झाल्याचे समजते या चर्चेनंतर कडासने यांची मालेगावात नियुक्ती झाली आहे.


ताज्या बातम्या