Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सर.! माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय

दि . 04/05/2020

रात्रीचे दहा वाजले असतील..  (डॉक्टर मित्राचा कॉल होता) माझा फोन वाजला, तसा मी लगेच रिसिव्ह केला..
म्हटलं "बोला डॉक्टरसाहेब.!"
तो म्हणाला, (तसा धीरोदात्त आवाजातच तो बोलला..)
 "सर.! माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय..!"

मी: "बापरे..! अरे डॉक्टर मित्रा, तू हे काय सांगतोय.?" आणि तू इतक्या सहजपणे सांगतोय त्याचेच मला आश्चर्य वाटतंय..!

"सर, मी रिपोर्ट कळवण्यासाठी तुम्हाला फोन नाही केलेला.. आता मला जे सांगायचं आहे, ते तुम्ही शब्दबद्ध करून लोकांना सांगावं..!" आणि तुम्ही ते लिहावं यासाठी हा फोन कॉल.!"

मी: "अरे बाबा, कायद्याने रुग्णांचे नाव जाहीर करता येत नाही.. मग कसं सांगणार तुझं मनोगत..?

तो: "सर फक्त तुम्हालाच कॉल करून सांगतोय आणि तुमच्याकडे ती शब्दांची श्रीमंती आहे तुम्ही माझं मनोगत नक्की पोहचवणार.! भले तुम्ही आता नको म्हटलं तरी..!......यानंतर आम्ही बरेच काही बोललो, एका कोरोनाग्रस्त रुग्णांशी मी बोलत होतो,खरतर हीच गोष्ट मला अस्वस्थ आणि अंतर्मुख करत होती. त्यापेक्षाही त्या रुग्णाची मनोभूमिका ऐकून मी काहीसा सुखावलो...! हो हो सुखावलोच..! त्याला कारणही तसेच आहे आणि हा सुखद धक्का तुमच्यापर्यंत नेणे हे मी कर्तव्य मानतो.. म्हणून हा प्रपंच..!!

तर गावकऱ्यांनो,
"ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव" या नुसत्या बातमीने आपल्या सर्वांना काळजात धस्स व्हायला आलं...
पण गेल्या दीड महिन्यापासून जग व देशातील आरोग्य व्यवस्थेतील सर्वच घटक कोरोनाच्या विरुद्ध एक योद्धा म्हणून लढत आहेत. जीव धोक्यात घालून.... सीमेवरचा सैनिक जसा देशवासियांना वाचवतो... अगदी तंतोतंत तसेच आपले डॉक्टर्स, नर्सेस,आशा वर्कर्स, आरोग्य रक्षक, पोलीस दल हे जिवाची बाजी लावून आपलं रक्षण करत सेवा देत आहेत..देश्याचे माननीय पंतप्रधान ते सामान्य माणूस आज आपापल्या परीने कोरोनाचा मुकाबला करत आहेत.
...पण अश्यावेळी कोरोनाबाधित विभागात सेवा देणं हे साधसुधे काम नाही, याची जाणीव असतांना ही माणसं लढाईत सर्वस्व झोकून देत सेवाकार्य करत आहेत. "घेतला वसा टाकणार नाही... म्हणत हे शूर जवान आजचे खरे योद्धा आहेत.!
काही लोकांनी तर या लढाईतुन पळ काढला असेलही पण मात्र लोक अश्या लढणाऱ्या वीरांनाच सलाम करते.
तो सांगत होता की, मी अजाणतेपणी नव्हे तर लोकांची सेवा करतांना कोरोनाबाधित झालोय,माझी चाचणी मी सावधानता बाळगत करून घेतली त्यामुळेच रोगाचा उलगडा झाला. आणि मी या रोगाला हरवणार आहे.... योग्य उपचार अन माझं उच्च मनोबल मला या लढाईत विजयी करणार आहे..!
पण काही (अ)ज्ञानी लोकांना संदेश पण द्यायचा आहे. आताही लढाई यापुढे प्रत्येकाला लढायची आहे. पुढचा काळ प्रत्येकाच्या परीक्षेचा असणार आहे. रोग तुमच्या जवळ कसा येईल हे कुणालाच ठाऊक नाही..! कुणाची बदनामी वा अफवांमुळे तुमचं तात्पुरते मनोरंजन होईलही पण ते टिकाऊ नसेल..!  त्यासाठी तुम्हाला धीरोदात्तपणे या रोगाचा सामना करावा लागणार आहे आणि हाच तो सांगावा आहे.
 मी एक वैद्यकीय सेवेकरी म्हणून अनवधानाने हा रोग स्वीकारला, त्याचा मुकाबला करण्याचे मनोबल मला गवसले आहे. माझ्या मित्रवर्य डॉक्टरांनी मला रिपोर्ट येण्यापूर्वीच योग्य औषधी देऊन माझ्यात तीव्र प्रतिकारशक्ती निर्माण केली होती..  पण मला गावाची आणि आपल्या मित्रांची काळजी आहे, ते जर या रोगाच्या विळख्यात आले तर त्यांनी याचा मुकाबला कसा करायचा.? ही चिंता मला भेडसावते आहे.
मी माझ्या व्यवसायाचा एक पाईक म्हणून माझं कर्तव्य समजतो की आपलं प्रबोधन करत राहावे तीच माझ्या वैद्यकीय सेवेची खरी शिकवण आहे..!
"होय, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय..!" ...पण मी त्याच्या विरोधात लढणार आहे आणि जिंकणार आहे..!!
तुम्ही ठामपणे या आजाराच्या विरोधात ताठ मनाने उभं राहावं हीच मी आपल्याकडून गावाचा लेकरू म्हणून अपेक्षा करतोय..

आज माझा परिवार, मित्र माझ्या सोबत आहेत यासारखी दुसरी जमेची बाजू कोणतीच नाही..!
मी लढतोय, लढत राहणार.!! आणि जिंकणारच!!!.
तुम्ही ही सावध व्हा..!

तुमचाच..!

🩺XYZ
--------------
मित्रांनो, या निरोपावरून आपण काय बोध घ्यायचा तो घ्याच.. पण संकटात कसं शुराप्रमाणे उभं राहावं याचा हा सर्वोत्तम वस्तुपाठ होय..! म्हणून या शूर सैनिकांस त्रिवार मानाचा मुजरा..!
"डॉक्टरमित्रा, तू कोरोनाला कधीच पराभूत करून टाकलं आहेस, आता त्यावर फक्त वैद्यकीय मोहोर उमटवणे बाकी आहे..! लवकर ठणठणीत बरा हो..!"
हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना..!

शब्दांकन:- घनश्याम एम अहिरे,
               (दाभाडी, मालेगाव नाशिक)


ताज्या बातम्या