Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
Lockdown: लॉकडाउनच्या काळात घरात झोपलेल्या चिमुरडीच्या अपहरणाचा प्रयत्न

दि . 02/05/2020

याच चिमुरडीच्या घरात दहा दिवसांपूर्वी झाली होती मोबाईलची चोरी 

लॉकडाउनकाळात एकीकडे गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे चित्र असताना उमरगा शहरात एका सहा वर्षांच्या मुलीचा अपहरणाचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेने कोरोनाच्या संकटात लॉकडाउनमुळे हैराण झालेल्या नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. झोपेत असलेल्या चिमुरडीला उचलून नेत असताना मुलीने आरडाओरडा केल्यामुळे अपहरणकर्ते तिला रस्त्यातच सोडून गेले. त्यामुळे तिची सुटका झाली असली तरी अपहरणकर्त्यांचा उद्देश काय होता, याचा शोध घेणे गरजेचे आहे.
उमरगा येथील रहिवाशी असलेले एक शिक्षक बाहेरील जिल्ह्यात नोकरीला आहेत. लॉकडाउनमुळे कुटुंबासह परत उमरगा येथे ते स्वगृही आलेले आहेत. २९ एप्रिलच्या रात्री जेवण करुन नेहमीप्रमाणे सर्व कुटुंबिय झोपी गेले होते. मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील सहा वर्षीय चिमुरडीच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे कुटुंबीय जागे झाले. जवळच झोपलेली मुलगी न दिसल्याने त्यांनी बाहेर पाहिले असता ती त्यांना घराबाहेर रस्त्यावर दिसून आली. ती घाबरलेल्या अवस्थेत असल्याने कुटुंबियांनी तिला आधी झोपी घातले. झोपेतून जागी झाल्यावर विचारपूस केली असता ती झोपेत असताना कोणीतरी उचलून घेऊन जात असल्याचं तिनं आपल्या आई-वडिलांना सांगितलं. आपण आरडाओरडा केल्यामुळे रस्त्यातच सोडून ते पळून गेल्याचंही तिनं सांगितलं. यावर तिच्या पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठून अज्ञात अपहरणकर्त्याविरूद्ध फिर्याद दिली. त्यावरुन उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दहा दिवसांपूर्वी झाली होती मोबाईल फोन चोरी!

दहा दिवसांपूर्वीही एका अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करुन आपला मोबाईल चोरुन नेला होता, असंही या शिक्षकांनं आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे. त्यावेळी देखील पोलीस ठाण्यात मोबाईल फोन चोरीला गेल्याची तक्रार देण्यात आली होती. आता चक्क चिमुरडीचेच अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे हे कुटुंब धास्तावले असून पोलिसांसमोर अज्ञात अपहरणकर्त्याचा शोध घेण्याचे आव्हान आहे.


ताज्या बातम्या