Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
वेळ मिळाला तर थोडं कौतुक आमचंही करा ! 

दि . 19/04/2020

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी डॉक्टर आणि पोलिस यांचे चालु असलेले शर्तीचे प्रयत्न आपण वाचत, ऐकत आणि बघत आहोत. त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. या लढाईत जीवाची बाजी लावून कामावर जाणारे आरोग्य,स्वच्छता, अग्निशमन, असे बरेच विभाग आहेत पण महानगरपालिका प्रशासनातील आणखी एक विभाग जिवाच्या आकांताने प्रयत्न करत आहे आणि तो म्हणजे  'पाणी पुरवठा विभाग' ज्या शिवाय सर्वच अशक्य आहे. 
एरवी पाणी पुरवठा म्हणजे प्रशासनातील सगळ्यात जास्त दुर्लक्षित असलेला पण तसेच सर्वात जास्त शिव्या खाणारा (नगसेवकांचे कॉल्स, हंडा मोर्चे असतातच की) विभाग म्हणावा लागेल, असो पण ह्याचे महत्व तुम्ही विसरता कामा नये कारण, 
'जल है तो जीवन है'. 
आमच्या नशीबी कौतुक कमी आणि उपहासाचे प्रसंगच जास्त येतात. एवढे सर्व सहन करत शहरातील तमाम जनतेची तहान भागवणारे पाणी पुरवठा कर्मचारी कोरोना साथीच्या या परिस्थितीतही सध्या स्वतःच्या जीवाची परवा न करता काम आहेत तसेच प्रशासकडून मास्क, सॅनिटाइजर, ग्लोव्हज अश्या कुठल्याही प्रकारची सुविधा न मिळाता सदर साहित्य स्वताचे पैशानेच विकत घेवुन तुमच्यासाठी 24x7 काम करत आहेत. कधी पोलिसांच्या लाठ्या खात तर कधी चुकवत, बॅरिकेट्स चे अडथळे पार करत गल्ली बोळातून रस्ता काढतांना रात्री अपरात्री अचानक अंगावर येणा-या कुत्र्यांपासुन बचाव करत ड्युटी करत आहेत. असेही वर्षभर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूतही काम असतेच त्यातही पावसाळ्यात येणारे गढूळ पाणी म्हणजे विचारुच नका डोळ्यात तेल घालून पाण्याची काळजी घ्यावी लागते. तसेच दिवाळी असो की ईद, सुट्टया न घेता आमचे काम चालुच असते कारण सणासुदीला पाणी किती लागते हे सांगायलाच नको नाही का? कोरोनाच्या जीवघेण्या साथीतही नियमितपणे आमचे काम चालुच आहे ते ही कुठलाही प्रकारचा खंड न पडता. आमचा निम्म्यापेक्षा जास्त स्टाफ बाहेर गावातून (३०-४० किमी अंतरावरून) दररोज ये जा करतो आहे. त्यातही त्यांना रोज फक्त १०० रू चे पेट्रोल दिले जात आहे. गावोगावी प्रवेशबंदी असल्याने तसेच दळणवळणाची साधने नसल्याने ब-याच     कर्मचा-यांना ह्या अडचणींना सामोरे जावे लागते आहे. त्यातील काही कर्मचारी गैरहजर असल्याने बाकीच्यांना कमी वेळेत अतिरीक्त कामाचा बोजा पडतोय हे वेगळे सांगायला नको, या कोरोनाच्या गर्दीत आमच्या शिफ्ट्सचे टाईमिंग वाढून ८ तासाची ड्युटी १६ तासांवर गेली आहे. 
  यातील बरेच कर्मचारी हे घरातले कर्तेधर्ते, जबाबदार व्यक्ती आहेत त्यांच्या जीवावरच घराची घोडदौड सुरु आहे. त्यांच्याही घरात म्हातारे आई वडील, भावंडे, बायको, लहान मुलं आहेत हे विसरता कामा नये. सध्याच्या स्थितीत महाराष्ट्रातील महानगरपालिकेत पाणी पुरणयवठा विभागात जवळपास ३०-४० % कर्मचारी हे कंत्राटी, हद्दवाढ किंवा मानधना तत्वावर आहेत. पण आपल्या मालेगाव महानगरपालिकेत  हेच प्रमाण जवळपास ८०-९० % एवढे प्रचंड असुन ते अतिशय कमी म्हणजे ५०००-१०००० रु महिना या अल्पशा मानधनावर कार्यरत राहुन आपणास सेवा देत आहेत. कोरोनाच्या जीवघेण्या साथीमध्ये प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारच्या जिवीतहानीची हमी नसतांना जिवावर उदार होवुन तसेच वरील अल्पशा मानधनावर परिवारातील सदस्यांनी केलेला विरोध आणि विनंतीला न जुमानता तुमच्यासाठी मागील १५-२० दिवसांपासून जीवाची पर्वा न करता अंखडित पाणी पुरवठा करीत आहेत. उन्हाळा असुनही सध्या तरी कुठल्याही परिसरात पाणी टंचाई नाही, कोणाच्याही डोक्यावर हंडा दिसत नाही किंवा नळांवर गर्दी दिसत नाहीये हे विसरून चालणार नाही. पाणी पुरवठा विभाग हा सुद्धा अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असल्याने देशातील आणिबाणीच्या प्रसंगात देश सेवा करण्याचे भाग्य अजमावत आहे. असाही वर्षभरासाठी आमचा लढा वाटतो तसा सोयीस्कर किंवा आणीबाणीच्या काळातपुरता असतो असे नाही, हे काम २४ तास आणि १२ महिन्यांच्या अथक परिश्रमाचे फलित आहे. पाण्यावर जवळपास ८-१२ तास डोसिंगची प्रकिया करुन मग कुठे पाणी वापरण्यासाठी तयार होत असते. यातही पी एच, हार्डनेस, टर्बीडीटी, सॉफ्टनिंग अश्या अनेक गोष्टी असतात. पाणी आणि वीज या दोन्ही सवती एकाच ठिकाणी नांदत असल्याने अतिशय सावधगिरीने हे काम करावे लागत असल्याने वाटते तितके सोपे काम मुळीच नसते हे. प्रत्येक वार्डासाठी पाण्याचे अतिशय सुक्ष्म नियोजन करावे लागते जेणेकरून पाणीपुरवठा सुरळीत होवू शकेल. शटडाऊन म्हणजे तुमची खरी कसोटी असते कारण विहित वेळेत तुम्हाला सर्व दुरुस्त्या करुन पाणीपुरवठा सुरळीत करावाच
लागत असतो यादरम्यानच्या अडचणी लिहिल्यास तर लेख मोठा होईन म्हणून जरा आवरते घेतो असो तुमच्या नळाची टॅप चालु केल्यानंतर सेकंदात येणा-या पाण्यामागे कुणा एका व्यक्तीचे काम किंवा जबाबदारी नसुन, हे एक टीमवर्क आहे ज्यात उप अभियंता, पर्यवेक्षक, मेकॅनिकल इंजिनिअर्स, पाण्यावर विविध प्रक्रिया करून पाणी पिण्याजोगे स्वच्छ करणारे तसेच टेस्ट करणारे फिल्टर इन्स्पेक्टर्स, चेमिस्ट्स, फिल्टर ऑपरेटर्स, ईलेक्ट्रिशिअन, पंप ऑपरेटर्स, फिटर, वार्डातील शेकडो व्हॉल्वमन्स, मजुर, शिपाई, वॉचमन, ही लोकं असतात. 
खरं तर अभिमान वाटतो या कामाचा आणि हो जाता जाता या जन्मासाठी देवाचे खुप खुप आभार की त्याने या पवित्र कामासाठी आमची निवड केली. 
शेवटी एकच सांगतो, 
💧Save Water....Every Drop Counts 💧
धन्यवाद !!! 

✍ Rushikesh Bachhav


ताज्या बातम्या