Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
वांद्रे गर्दीनंतर सूरतमध्ये पुन्हा एकदा मजूरांचे आंदोलन

दि . 15/04/2020

मुंबईच्या वांद्रे स्थानकात मंगळवारी दुपारी अचानक हजारो मजुरांनी गावी परतण्यासाठी गर्दी केल्याचा प्रकार घडला. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा सूरतमध्येही शेकडो कामगारांनी गावी परतण्यासाठी आंदोलन केले. याआधी मागच्या आठवड्यात शुक्रवारी काही कामगारांनी हिंसक आंदोलन केले होते. सूरत शहरातील वरच्छा परिसरात शेकडो कामगार रस्त्यावर बसून धरणे आंदोलन करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सूरतमधील वरच्छा हे शहर हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच इथे अनेक टेक्सटाईल कंपन्या देखील आहेत. या दोन्ही क्षेत्रात याठिकाणी लाखो कामगार काम करत आहेत. टेक्स्टाईल कंपन्यांमध्ये काम करणारे अनेक कामगार हे उत्तर प्रदेश, ओडिशा आणि बिहार राज्यातून आलेले आहेत. लॉकडाऊन वाढत चालल्यामुळे त्यांनी आम्हाला घरी जाऊद्या, ही मागणी लावून धरली आहे. आंदोलनकर्त्या कामगार काही केल्या ऐकायला तयार नव्हते. त्यानंतर स्थानिक आमदार आणि राज्याचे आरोग्य राज्य मंत्री किशोर कनानी यांनी घटनास्थळी जाऊन कामगारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
“या कामागारांच्या जेवणाच्याबाबत तक्रारी आहेत. कँम्प मधील जेवण आम्हाला नको आहे. आम्हाला आमच्या घरी जाऊद्या, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. त्यानंतर आम्ही काही स्थानिक एनजीओच्या मदतीने कामगारांना जेवणाची पाकिटे वाटली. त्यानंतर कुठे परिस्थिती नियंत्रणात आली.”, अशी माहिती आंदोलन आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणारे सुरतचे पोलीस आयुक्त आर.बी.ब्रह्मदत्त यांनी दिली.
स्थलांरतरीत कामगारांचा प्रश्न अनेक राज्यांमध्ये निर्माण झालेला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन कामागारांना केले. आम्ही कोणत्याही बस सोडत नसल्याचे ते म्हणाले. तेलंगणामध्ये तर बिहारच्या एका कामगाराने घरी जायला मिळत नाही म्हणून आत्महत्या करण्याची घटना समोर आली आहे.


ताज्या बातम्या