Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
शहरात कोरोना विषाणू तपासणी लॅब कार्यान्वित करावी :आम्ही मालेगावकर संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

दि . 11/04/2020

मालेगाव (प्रतिनिधी) :- शहरात कोरोना विषाणू तपासणी लॅब कार्यान्वित करावी, आरोग्य विभागाचे प्रशिक्षित डॉक्टरांचे विशेष पथक मदतीसाठी पाठविण्यात यावे तसेच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी मालेगावच्या परिस्थीतिची माहिती असलेल्या जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी विशेष नियंत्रण व समन्वय अधिकारी (स्पेशल ड्युटी) म्हणून नियुक्त करण्यात यावे अशी मागणी येथील आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

शहरात ९ करोना विषाणू संक्रमित रुग्ण आढळून आले असून यात एक रुग्ण दगावला आहे. त्यातील  यातील बहुतांश रुग्णांनी कोठेही प्रवास केलेला नाही. त्यामुळे शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. मालेगाव शहर हे लोकसंख्येची दाट घनता असलेले शहर असल्याने याठिकाणी संक्रमित होण्याचे प्रमाण जलदगतीने वाढू शकते. शहरातील कमालपुरा, मोमिनपुरा, मदिनाबाग, गुलाब पार्क भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तसेच आरोग्य तपासणीसाठी वेगवेगळ्या टीम तयार करून घर ते घर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यात मोठ्या प्रमाणावर नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. मालेगाव शहरात कोरोना विषाणू तपासणी लॅब उभारली गेल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होऊ शकेल. 

शहरात सामान्य रूग्णालय व महापालिकेच्या आस्थापनेवरील फिजिशन डॉक्टर यांची संख्या लोकसंख्येच्या दृष्टीने अतिशय अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे ठराविक काही डॉक्टरांवर प्रचंड तान येत आहे. अशा गंभीर परिस्थितीत डॉक्टर व परिचारिका रात्रं दिवस सेवा देत आहेत, त्यांना देखील ठराविक काळ आरामाची गरज आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता एम.एस., एम.डी. व इतर स्पेशालिस्ट डॉक्टर व प्रशिक्षित परिचारिका मालेगावातील विविध शासकीय रुग्णालयात नियुक्त करण्याची गरज असून त्यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज होऊन जलद गतीने सेवा देऊ शकेल व कोरोना अटकाव करण्यासाठी पुरेशी मदत होईल.

मालेगाव सह नाशिक शहरात व जिल्ह्यातील लासलगाव, चांदवड येथे देखील कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनावर मोठा ताण येत आहे. मालेगाव शहरात  अपर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, अपर पोलिस अधीक्षक हे सर्व समकश अधिकारी आहेत. त्यामुळे कठोर निर्णय घेतांना वरिष्ठांच्या परवानगीच्या प्रतीक्षेत अमंलबजावणी होण्यास अनेक वेळा उशीर होतो. करोना संकट गंभीर रूप धारण करत आहे. नाशिक येथील वरिष्ठ अधिकारी मालेगावात येऊन कार्यवाही करण्यात वेळेचा अपव्यय होतो, यावर वेळीच धोरणात्मक निर्णय घेऊन उपाय योजना करत संकट निवारण्यासाठी जिल्हाधिकारी दर्जाचे विशेष नियंत्रण व समन्वय अधिकारी काहि काळासाठी नियुक्त होणे आवश्यक आहे. त्यातून जागेवर सर्व विभागांना आदेश देणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे, धोरणात्मक निर्णयांची अमंलबजावणी होण्यास, आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपयुक्त ठरेल.

तरी मालेगाव शहरात करोना विषाणू तपासणी लॅब कार्यान्वित करण्यात यावी,आरोग्य विभागाचे प्रशिक्षित डॉक्टरांचे विशेष पथक मदतीसाठी पाठविण्यात यावे तसेच मालेगाव महानगराची परिस्थित अतिशय चिंताजनक असून याठिकाणी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी मालेगावच्या परिस्थीतीची माहिती असलेल्या जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची विशेष नियंत्रण व समन्वय अधिकारी (स्पेशल ड्युटी) म्हणून नियुक्त करण्यात यावे अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती सदस्य निखिल पवार, देवा पाटील, अॅड शिशिर हीरे, सुशांत कुलकर्णी, अॅड.अतुल महाजन, यशवंत खैरनार, विवेक वारुळे, कपिल डांगचे, प्रवीण चौधरी, अतुल लोढा आदींनी केली आहे.


                 


ताज्या बातम्या