Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या सोशल मीडियातील अफवांमुळे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू  : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

दि . 06/04/2020

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने समाज विघातक,गुन्हेगारी वृत्तीचे लोक दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे संदेश अथवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा अफवा,  बाधित व्यक्तींच्या संख्या, त्यांच्या वरील उपचार व त्यात बळी पडलेल्या रुग्णांची संख्या तसेच या विषाणूचा प्रादुर्भाव झालेला परिसर या  संशयित कोरोना बाधित व्यक्ती या बाबत कोणतीही खातरजमा न करता माहिती, बातमी सोशल मीडिया, विविध प्रसार माध्यमांमध्ये पसरवत आहेत. त्यामुळे समाजात अकारण भिती उत्पन्न होते आहे. अशा संदेश, अफवा, बातमीमध्ये सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. 
त्यावर  अंकुश ठेवण्यासाठी  उपाययोजना करणे आवश्यक असल्याची खात्री झाल्याने जिल्ह्यात 144 (2) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश 6 एप्रिल ते पुढील आदेशापावेतो लागु केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.

कोरोना संबंधी औषधोपचार विषयी अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या अथवा अधिकृत मान्यता नसलेल्या कोणत्याही बाबी, तसेच धार्मिक अथवा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या अथवा जनतेमध्ये अकारण भयाची भावना निर्माण होईल अशा प्रकारच्या कोणत्याही बाबी तसेच अधिकृत स्त्रोतांकडून खातरजमा न करता परस्पर अनाधिकृत माहिती कोणत्याही प्रकारे प्रसृत करणे.

सोशल मिडिया, एसएमएस, व्हॉटसअप, फेसबुक, ट्विटर, टिकटॉक, हॅलो, टेलिग्राम किंवा इतर कोणत्याही डिजिटल माध्यमांमध्ये दोन समाजात जातीच तेढ, धार्मिक तेढ निर्माण होईल असे कोणतेही प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह संदेश, साहित्य, चित्रफित इत्यादी प्रसारणासाठी वैयक्तिकरित्या जबाबदार राहतील.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती अथवा समूह भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे तसेच इतर प्रचलित कायद्यातील तरतूदीनुसार शिक्षेस पात्र राहील. 

सोशल मिडिया, एसएमएस, व्हॉटसअप, फेसबुक, ट्विटर, टिकटॉक, हॅलो, टेलिग्राम अथवा इतर कोणत्याही सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचे ग्रुप ॲडमिन तसेच वैयक्तिकरित्या सोशल मिडिया वापरणारे व्यक्ती यांना प्रत्येकास आदेशापुर्वी स्वतंत्र नोटीस बजावणे शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 (2) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, नाशिक जिल्या वतील सर्व पोलीस स्टेशन यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
सदरचे आदेश 6 एप्रिल 2020 पासुन पुढील आदेशापर्यंत तात्काळ लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सूरज मांढरे यांनी आदेशान्वये कळविले आहे.


ताज्या बातम्या