Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
करोना च्या पार्श्वभूमीवर असलेल्या बंदचा मालेगाव मनपाच्या विकास कामांना ब्रेक...

दि . 04/04/2020

मालेगाव - करोनाचा पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉक डाऊन जाहीर करण्यात आले. याचा आर्थिक फटका सर्वच क्षेत्रात बसला असून मालेगाव महापालिकेला देखील यामुळे खर्चात कपात करण्याची वेळ आली आहे. करोनामुळे ओढवलेले आर्थिक व आरोग्य संकट लक्षात घेता पालिका आयुक्तांनी शासन आदेशानुसार पालिकेच्या अत्यावश्यक खर्च वगळता इतर कामांवरील खर्च रद्द करण्याचे आदेश आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिले आहेत. लॉक डाऊन मुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे पालिकेचा महसूल देखील मोठ्या प्रमाणात घटणार आहे. अशातच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेला खर्च करावा लागणार आहे. आधीच पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने त्यात करोनाचे संकट ओढवल्याने मनपाच्या विकास कामांना ब्रेक लावण्याची वेळ आली आहे. यासाठी पालिका आयुक्त किशोर बोर्डे यांनी आदेश दिले असून खर्च कापतीचा निर्णय घेतला आहे. त्यात सन २०१८-१९ पूर्वीची सर्व मनपा फंडातील कामे रद्द करण्यात आली आहेत. सन २०१८-१९ मध्ये मंजूर असलेली परंतु अद्याप सुरु न झालेली कामे रद्द करण्यात आली आहेत. याच कालावधी दरम्यान मुदतीनंतर पूर्ण झालेल्या कामांवर दंड लावून ती अंतिम केली जाणार आहेत. सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील स्थायी समितीत मान्य असलेली कामे व २५ लाख पेक्षा कमी किंमतीच्या कामांची निविदा दि २३ मार्च २०२० पूर्वीच अंतिम झाली असेल असेच अत्यावश्यक स्वरूपातील कामे अनुज्ञेय राहणार आहेत.

" करोनाचा पार्श्वभूमीवर आरोग्य व आर्थिक आपत्तीवर मात करण्यासाठी शासनाआदेशानुसार उपाययोजना केल्या जात आहेत. पालिकेच्या अत्यावश्यक कामांवरील खर्च वगळता इतर कामांवरील खर्च रद्द करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने उपाययोजना केल्या आहेत. " - किशोर बोर्डे, आयुक्त, मालेगाव मनपा


ताज्या बातम्या