Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
महिला पत्रकाराबद्दल अश्लील ट्विट भोवलं : भाजप पदाधिकारी अटकेत..

दि . 04/04/2020

अशा वृत्तींना वेळीच आवर घालायला हवा...

एका मराठी वृत्तवहिनीच्या महिला पत्रकाराने केलेल्या ट्‌विटला अश्‍लील भाषेत उत्तर दिल्याने भाजप सोशल मीडियाचा पदाधिकारी असलेल्या येथील "एचएएल' कर्मचारी विजयराज जाधव याच्या विरोधात ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणाची स्वतः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेऊन पोलिसांना कारवाईच्या सुचना केल्या होत्या. त्यानिमित्ताने सोशल मिडीयावरील थिल्लरपणाला चांगलीच चपराक बसण्याची शक्‍यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाबद्दल या महिला पत्रकाराने ट्विट केले होते. त्यांच्या ट्‌विटला नाशिक येथील एच.ए.एल. या शासकीय सेवेचा भाग असलेल्या संस्थेतील कर्मचारी तसेच भारतीय जनता पक्षाचा माजी प्रसिद्धी प्रमुख विजयराज जाधव यांनी अर्वाच्च व अश्‍लील भाषेत उत्तर दिले होते. याबाबत संबंधित पत्रकार महिलेने  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, पोलिस महासंचालक यांपासून तर थेट नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंह यांच्यापर्यंत तक्रार केली. या तक्रारीनंतर संबंधीत ट्‌विटची थेट राज्याचे गृहमंत्री  देशमुख यांनी दखल घेतली. त्यांनी या प्रकरणात  पोलिसांना दखल घेण्याची सूचना केली.

थेट गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याने सुत्रे वेगाने हलली. त्यांनी संबंधीत विजयराज जाधव याच्यावर कारवाईसाठी दबाव वाढला. त्यानंतर पोलिसांनी त्यास उमराने (ता. देवळा) येथून ताब्यात घेऊन ओझर (निफाड) पोलीसांच्या ताब्यात दिले. ओझर पोलिसांनी श्री. जाधव याला अटक केली. त्याची वैद्यकीय चाचणी केली असता त्याचा रक्तदाब वाढल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. विजयराज जाधव याच्यावर कलम 354 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पुढील तपास करीत आहेत.
(सरकारनामा)


ताज्या बातम्या