Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
आता आपत्कालीन परिस्थितीत डायल करा ‘हा’ नंबर

दि . 08/03/2020

विविध आपत्कालीन परिस्थितीतीमध्ये आपल्याला विविध नंबर डायल करावे लागावे लागत असत. यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी १०० क्रमांक, आग लागल्यास अग्निशमन दलासाठी १०१ आणि रुग्णवाहिकेसाठी १०८ असे तीन क्रमांक लक्षात ठेवावे लागत असत. मात्र, आता कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पोलिस नियंत्रण कक्षाचा ११२ हा एकच क्रमांक उपलब्ध होणार आहे. तब्बल चारशे कोटी रुपये खर्च करून डायल ११२ या टोल फ्री क्रमांकाची सेवा सुरु करण्याची महत्वाकांक्षी योजना राज्याच्या गृह विभागाने आखली आहे. पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका सेवा या तीन यंत्रणांमध्ये समन्वय झाला नाही तर मदत मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे संपूर्ण देशात आपत्कालीन सेवा ११२ या एकाच टोल फ्री क्रमांकावर उपलब्ध करून देण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. या नवीन टोल फ्री क्रमांकाच्या सेवेसाठी राज्यातील पोलिस नियंत्रण कक्षाचे आधुनिकीकरण करण्याची महत्वाकांक्षी योजना राज्याच्या गृह विभागाने आखली आहे. महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद सेवेसाठी पोलिस विभाग व महेंद्र डिफेन्स सर्व्हिसेस यांच्यात करार करण्यात आला आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे ४०४ कोटी ४४ लाख ६१ हजार रुपये आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात या प्रकल्पासाठी सुमारे ६ कोटी ४३ लाख ४४ हजार रुपयांचा निधी वितरित करण्याबाबत राज्याच्या गृह विभागाने अलिकडेच शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे नजिकच्या भविष्यात ही योजना प्रत्यक्षात सुरु होण्याची चिन्हे आहेत.

डायल  112

डायल ११२ क्रमांकावर पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळेल. या हेल्पलाईसाठी पुणे व नागपूरमध्ये मध्यवर्ती काँल सेंटर तयार करण्यात येईल.

आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा

आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवण्यासाठी एकच क्रमांक ठेवल्यास सर्वसामान्यांना वेळेत मदत मिळेल. या टोल फ्री क्रमांकावर मदत मागणा-या व्यक्तीचे ‘लोकेशन’ तत्काळ समजेल. त्यामुळे संकटात सापडलेल्या व्यक्तीला कमीत कमी वेळेत मदत पोहोचण्यास मदत होईल. कॉल सेंटरवर मदतीसाठी फोन आल्यास क्षणाचाही विलंब न लावता यंत्रणा कार्यान्वित होईल. मुख्य म्हणजे कॉलसेंटरमध्ये मराठी भाषेत उत्तर देणारी व्यक्ती ठेवण्यात येईल.

वाहनांची गरज

या सेवेसाठी ग्रामीण भागात सुमारे १ हजार ४८ तर शहरी भागात ४५४ व्हँनची गरज भासेल तर ग्रामीण भागात २ हजार २१ टू व्हिलर आणि शहरी भागात २४२ टू व्हीलर्स तैनात करण्याचा प्रस्ताव आहे.

 

 

 

 

 


ताज्या बातम्या