Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सोंग करुन सहप्रवासी महिलेचे दागिने चोरणारी टोळी अटकेत

दि . 04/03/2020

सोंग धरुन सहप्रवासी महिलेचे दागिने चोरणाऱ्या टोळीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.
 सर्व महिला प्रवास असलेल्या रिक्षामध्ये उलटी आल्याचं सोंग करुन सहप्रवासी महिलेचे दागिने चोरणारी महिला गँग सध्या सक्रिय झाली आहे. एकमेकांच्या जाऊबाई असलेल्या या टोळीला नागपूर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. विशेष म्हणजे नागपुरात दागिने चोरण्यासाठी ही टोळी थेट वर्ध्यातून ऑटोने नागपुरात यायची. 56 वर्षीय फिरोजा बेगम 26 फेब्रुवारी रोजी कुटुंबियांसाठी आवश्यक औषध घ्यायला इंदोरा परिसरात आल्या होत्या. औषध घेतल्यानंतर त्यांनी मंसुरी कॉलनीत जाण्यासाठी त्यांनी शेयर रिक्षा घेतली. एकटी महिला म्हणून ज्या रिक्षामध्ये आधीच महिला बसल्या होत्या, त्याला त्यांनी प्राधान्य दिल. मात्र, इथेच त्यांचा घात झाला. थोडं अंतर गेल्यावर रिक्षामधील महिलेने उलटी आल्याचं सोंग केलं. महिलेला उलटी होत असल्याचं पाहून एकच गोंधळ झाला. तेवढ्यात चालकाने रिक्षा थांबवली. उलटी अंगावर पडेल या भीतीने फिरोजा बेगम लगेच थांबलेल्या रिक्षाबाहेर उतरल्या आणि चालकाने इतर सर्व प्रवाशांसह रिक्षा नेली. यानंतर फिरोजा बेगम यांनी गळ्याला हात लावल्यावर त्यांची दोन तोळ्यांची सोन्याची गोफ सोबतच्या महिला प्रवाशांनी पळवली आहे. फिरोजा बेगम यांची तक्रार आल्यानंतर जरीपटका पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासलं. अनेक रस्त्यांवर एक संशयित रिक्षा सर्व महिला प्रवाशांसह दिसली. मात्र, नांदेडची नंबरप्लेट असलेली रिक्षा नागपुरात पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटलं. दुसऱ्या दिवशी दयानंद पार्कजवळ पुन्हा तिच रिक्षा दिसल्यानंतर पोलिसांनी शेख फिरोज नावाच्या चालकाला ताब्यात घेत विचारणा केली आणि सर्व गौडबंगाल समोर आलं.
 चोरट्यांची ही टोळी महिलाच चालवत होत्या. त्याचं नेतृत्त्व दोन सख्ख्या 'जावा' रंजीता आणि कुमा पात्रे या करत होत्या. रिक्षाचालकही त्यांच्याच टोळीचा सदस्य आहे. ही टोळी दागिने घातलेल्या एकट्या महिलेला आपल्या ऑटोमध्ये बसवून घ्यायची. त्यानंतर टोळीतील एक महिला उलटी आल्याचं सोंग करायची. तर दुसरी घाबरण्याचं नाटक करत हळूच शेजारी बसलेल्या महिलेच्या गळ्यात हात घालून तिचा दागिना लंपास करायची. महिलांचा गोंगाट ऐकून चालक रिक्षा थांबवायचा आणि पीडित महिला खाली उतरताच रिक्षा सुरु करुन ही टोळी पळ काढायची. विशेष म्हणजे नांदेडची ही टोळी वर्ध्यातून रिक्षाने नागपूरला यायची आणि चोऱ्या करुन रिक्षानेच पुन्हा वर्ध्याला पळून जायची. पोलिसांनी या दोघींना अटक केली आहे. तर त्यांना साथ देणाऱ्या रिक्षाचालकालाही बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या टोळीतील इतर काही महिला सदस्य फरार असल्याचा पोलिसांना संशय आहे. या टोळीने नागपुरात तसंच इतर शहरात आणखी काही महिलांना टार्गेट केले आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.


ताज्या बातम्या