Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सुवर्णपानं इतिहासाचे : छत्रपती शिवाजी महाराज

दि . 19/02/2020

छत्रपती शिवाजी महाराज
(इ.स.१९ फेब्रुवारी १६३० - ३ एप्रिल १६८०)

      हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,आदर्श शासनकर्ता,सर्वसमावेशक सहिष्णू राजा,निष्ठावान,पराक्रमी,रयतेचा धनी,निश्चयाचा महामेरू,बहुतजनांसी आधारू,अखंडस्थितीचा निर्धारू,श्रीमंतयोगी, प्रौढ प्रताप पुरंदर...क्षत्रिय कुलावंतस्...सिंहासनाधिश्वर...
महाराजधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला.त्यांच्या आई राजमाता जिजाऊ आणि वडील शहाजी राजे भोसले होते.शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे "शिवाजी" असे नामकरण करण्यात आले.

         महाराजांच्या बालमनावर उत्तम संस्कार राजमाता जिजाऊंनी केले.लहानपणीच रामकृष्णाच्या,शुरवीरांच्या गोष्टी राजमाता सांगत असत.तलवारबाजी,युद्धकौशल्य,नितीशास्र यात त्यांना ते तरबेज करत होत्या.शहाजी राजे भोसले यांनी त्यांच्यावर रणनिती व युद्धाभ्यासाचे संस्कार केले.जिजाऊंनी पुण्याचा कारभार पाहत असतांनांच हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजी महाराजांना स्फुर्ती दिली.पुढे त्यांचे लग्न सईबाईंशी झाले.त्यांच्या सोयराबाई,पुतळाबाई,सकवारबाई,काशीबाई याही इतर पत्नी होत्या.

       मराठा साम्राज्य स्थापन करण्यासाठी किल्ल्यांचे महत्त्व महाराज जाणून होते.वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचे तोरण बांधले.पुढे चाकण आणि कोंढाणा म्हणजेच सिंहगड किल्ले ताब्यात घेतले.शत्रूविरूद्ध लढ्याकरिता महाराष्ट्रातल्या डोंगरदऱ्यांमध्ये अनुकूल असलेली गनिमी काव्याची पध्दत त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही,अहमदनगरची निजामशाही,बलाढ्य मुघलशाहीविरूद्ध लढा दिला आणि मराठा साम्राज्याचे बीजारोपण केले.स्वतःचे स्वराज्य स्थापण करण्यासाठी आदिलशाही,निजामशाही आणि मुघलसाम्राज्य ज्या स्थानिक किल्लेदारांवर अवलंबून होते,त्या किल्लेदारांना विश्वासात घेत,अन्यायी किल्लेदारांच्या तावडीतून जनतेची सुटका करत जनतेचा विश्वास जिंकला.

        इ.स.१६५६ साली आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचे चंद्रराव मोरे याला धडा शिकवत महाराजांनी रायरीचा किल्ला सर केला आणि कोकण भागात स्वराज्याचा विस्तार केला.इ.स.१६५९ पर्यंत पश्चिम घाटातील व कोकणातील चाळीस किल्ल्यांवर विजय मिळविला होता.आदिलशहाशी होत असलेला संघर्ष अन् जिंकत असलेले किल्ले यांनी बेजार होऊन आदिलशहाने शिवाजी राजांना संपविण्याचा विडा राजदरबारात ठेवला.हा विडा अफजलखान सरदाराने उचलला.प्रतापगडावर महाराज व अफजलखानाची भेट झाली.यात अफजलखान दगा करेल याची राजांना आधीच कल्पना असल्याने समयसुचकतेने राजेंनी अफजलखानाचा वध केला.राजेंवर सय्यद बंडाने केलेला वार जिवा महालेने आपल्या अंगावर घेतला आणि राजेंचा जीव वाचविला म्हणूनच "होता जीवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण प्रचलित झाली.

        शिवाजी महाराजांचा सर्वाधिक संघर्ष राहिला तो मुघलांशी.बलाढ्य असलेले मुघल साम्राज्य संपूर्ण भारतभर पसरलेले होते आणि दिल्ली शासक औरंगजेब दक्षिण भारतात आपली पावले रोवू इच्छित होता.शिवाजी महाराज यांचे स्वराज्य त्यास दक्षिण भारतात पाय रोवण्यास अडथळा ठरत होते म्हणूनच शाहिस्तेखानाची दख्खनची अयशस्वी मोहिम बादशहाने राबविली.पुढे महाराजांनी सुरतेवर आक्रमण करून मुघल सत्तेस आव्हान देत आपल्या राज्याच्या खजिन्यात भर घातली.

       मिर्झा राजे यांनी इ.स.१६६५ मध्ये शिवाजी राजेंशी पुरंदरचा तह केला.त्यानुसार औरंगजेब बादशहासमोर मुलगा संभाजीसह त्यांना हजर रहावे लागले.तेथे त्यांचा बादशहाने अपमान केला व त्यांना नजरकैदेत ठेवले.अत्यंत कुशलतेने,नियोजनाने तेथूनही राजे सहीसलामत स्वराज्यात सुखरूप परत आले.दिल्लीभेटीपूर्वी राजेंच्या अनुपस्थितीत अष्टप्रधान मंडळाने स्वराज्याचा राज्यकारभार चालविला होता.

      ६ जून १६७४ मध्ये राजेंनी शिवराज्याभिषेक रायगडावर केला.हजारो राजेंच्या उपस्थितीत अन् राजमाता जिजाऊंचा आशीर्वाद घेत स्वराज्याला छत्रपती मिळाला.राजेंच्या स्वराज्यासाठी शिवा काशीद,तान्हाजी मालुसरे,बाजीप्रभू देशपांडे यांसारखे अनेक साथीदार धारातिर्थी पडले होते.राजेंच्या नुसत्या हाकेवर आपल्या प्राणाची आहुती द्यायला त्यांची रयत तयार असायची."लाख मेले तरी चालतील,पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे" अशी ठाम ज्योत रयतेच्या हृदयी होती.स्वाभिमानी असलेल्या राजेंनी 'शिवराई','होन' नावाचे चलन सुरू केले.त्यांनी राजब्रीदवाक्य स्विकारले.

'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'

      स्वतः तयार केलेल्या सैन्यानिंशी,मावळ्यांच्या साथीने मोठ्या कष्टाने स्वराज्याला आपला छत्रपती लाभला होता.

     मावळ्यांचे संघटन करून निष्ठा व ध्येयवाद जागृत करून स्वराज्यासाठी खंबीर फळी त्यांनी तयार केली होती.स्वतः शपथ घेऊन स्वराज्य स्थापनेच्या कार्यात झोकून दिले.महत्त्वाचे गड किल्ले जिंकले,नवे निर्माण केले.योग्य वेळी आक्रमण आणि योग्य वेळी तह करत गनिमी काव्याची नवी युद्धनिती राजेंनी दिली.शत्रूंचा सामना करत असतांनाच त्यांनी स्वराज्यांतर्गत असलेल्या दगाबाजांचाही सामना केला.सामान्य रयतेची सेवा,शेतकऱ्यांसाठी व्यवस्था,सैनिकांसाठी व्यवस्था,धार्मिकतेचे रक्षण त्यांनी यावेळी केले.सर्वधर्मसमभाव हा त्यांच्यातला खास गुण होता.खचलेल्या रयतेत स्वाभिमानाचा,स्वातंत्र्याचा,स्वराज्य निष्ठेचा हुंकार राजेंनी भरला.

         छत्रपती शिवाजी राजेंनी मराठ्यांचे स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करून मध्ययुगीन भारताच्या इतिहासात नवे पर्व सुरू केले.पश्चिम महाराष्ट्र,कोकण,सह्याद्री डोंगर रांगांपासून नागपूरपर्यंत,उत्तर महाराष्ट्र,दक्षिण भारतात तंजावरपर्यंत त्यांची राज्यव्याप्ती होती.रायगड हे राजधानीचे शहर राहिले.नेहमी अग्रस्थानी राहिलेला सेनानायक म्हणून त्यांना ओळखले जाते.अत्यंत साधेपणाने सैन्यात मिसळून कसोटीच्या,संकटाच्या प्रसंगांना त्यांनी तोंड दिले.समानता तत्त्वाचा योग्य उपयोग करत त्यांनी सैन्यात सर्व जातीधर्माच्या लोकांना समाविष्ट करून घेतले होते.शेकडोंना प्रशिक्षित केले.अविरत परिश्रम करत स्वराज्य निर्माण केले.नवीन वैभव स्वराज्यास प्राप्त करून दिले.असा हा वंदनीय युगपुरूष स्वराज्यासाठी झटत असताना ३ एप्रिल १६८० मध्ये रायगडावर अनंतात विलीन झाला.

      भारत देशात विशेष महाराष्ट्राच्या भूमीत छत्रपती शिवाजी राजेंचा जन्म झाला हे केवढे मोठे सौभाग्य..! या महापुरूषांच्या गौरवगाथा ऐकतांना,वाचतांना अंगावर रोमांच उभे राहतात.त्यांच्या विविधांगी गुणांचा,जाज्वल्य पराक्रमाने इतिहास घडविला.त्यांचे नाव इतिहासाच्या सुवर्णपानात सुवर्णाक्षरांनी कोरले गेलेच,पण आजही १७ व्या शतकात जागृत झालेला स्वाभिमान,ती स्वराज्यनिष्ठा उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा देते.शिवचरित्र आज जीवनाला दिशा देऊन जाते.संस्काराचं आदर्श रूप म्हणून शिवचरित्र आज घराघरात वाचलं जातं. आज महाराष्ट्राच्या घराघरात शिवजन्मोत्सव साजरा केला जातो.हृदयात अन् आसमंतात एकच आवाज घुमतो....

प्रौढ प्रताप पुरंदर....
क्षत्रिय कुलावंतस्...
सिंहासनाधिश्वर...
महाराजाधिराज...
श्री छत्रपती शिवाजी महाराज की ....जय..!

अशा या महान हृदयातल्या श्रद्धास्थानास मानाचा मुजरा..!

जय भवानी,जय शिवाजी

- भरत विठ्ठल पाटील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीनगर 
ता.मालेगाव जि.नाशिक 


ताज्या बातम्या