Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
जवानांचे माहेरघर ठरतेय सोनज , आणखी पाच तरुण एकाच वेळी सैन्यदलात..

दि . 13/02/2020

योगेश बच्छाव 
मालेगाव : तालुक्यातील सोनज या गावाला आता जवानांचे माहेरघर अशी नवी ओळख मिळू पाहत आहे. आतापर्यंत  शंभरहून अधिक स्थानिक तरुण सैन्यात सेवा करीत असतांना आणखी गावातील पाच तरुणांनी आता सैन्यदलात धडक मारली आहे.

सोनज येथील  तापर्यंत शंभर पेक्षा अधिक तरुण सैन्यात तर दहा पेक्षा अधिक तरुण अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांचीच प्रेरणा घेत येथील राहुल राजेंद्र वेताळ, गौरव कडु सुर्यवंशी,   भुषण जिभाऊ बोरसे, राधेश्याम प्रकाश बच्छाव , किरण धनजी बच्छाव या पाच तरुणांची एकाच वेळी सैन्यदलात निवड झाली आहे. विशेष म्हणजे हे सर्व तरुण मित्र असून ते एकाच वेळेस सैन्य दलात भरतीची तयारी करत होते आणि सैन्य दलात भरती असली की, पाचही मित्र एकाच वेळी सैन्यात भरतीच्या वेळी जात होते. मागील महिन्यात झालेल्या सैन्य दलाच्या भरतीत या सर्वांची पहिल्याच प्रयत्नात निवड झाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे येथील प्राथमिक शाळेतच झाले असून काही जण बारावी झालास असून काहींनी पदवीला प्रेवेश घेतलेला आहे.  अलीकडच्या काळात वाढलेल्या बेरोजगारीमुळे ग्रामीण भागातील तरुण आता सैन्यदल तसेच पोलिस दलात भरती होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत. सोनज गावातील बरेचसे तरुण इंडियन आर्मी, मुंबई पोलिस, सीआरपीएफ, कमांडो, पोलिस उपनिरीक्षक आदी पदांवर कार्यरत असून देशसेवा करण्यासाठी आपला सहभाग नोंदवत आहेत. हे पाचही तरुण वयाच्या २० व्या वर्षीच सैन्य दलात भरती झाल्याने संपूर्ण गावातील सर्वात लहान जवान म्हणन त्यांची ओळख निर्माण झाली आहे. सोनज येथील शंभरपेक्षा अधिक तरुण देशसेवा करीत असून आपल्या गावाचे नाव उज्वल करीत आहेत. पुर्वी सोनज हे गाव शिक्षकांचे गाव म्हणून ओळखले जात होते. मात्र आता शिक्षकांपेक्षा सैन्यदलात भरती होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या सर्व तरुणांना गावातील पोलीस दलात असलेले राजू बच्छाव, सैन्यदलात मुकेश बच्छाव, प्रफुल्ल बच्छाव आदींचे मार्गदर्शन मिळाले. निवड झालेल्या तरुणांचे माजी सरपंच संग्राम बच्छाव, सरपंच युवराज बच्छाव यांनी अभिनंदन केले आहे.
--------------
 देशसेवेसाठी गावातील तरुण 
सैन्य दल : १०८
पोलीस दल : २८
पोलिस निरीक्षक : २
सहाय्यक पोलीस निरीक्षक : ३
आयकर उपायुक्त : १
मोटार वाहन निरीक्षक : ३
तटरक्षक दल : १
------------

गेल्या २०११ मध्ये मी भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली व यात मी यशस्वी झालो. आज मी पुणे येथे आयकर उपायुक्त म्हणून सेवा बजावत आहे. गावातील इतर तरुणांनी देखील अभ्यास करून आपल्या सोनज गावाचे नाव उज्ज्वल करावे.
-जीवन बच्छाव,
आयकर उपायुक्त, पुणे


ताज्या बातम्या