Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मेशी येथे दोन तरुण युवकांचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू.

दि . 08/02/2020

देवळा : तालुक्यातील मेशी येथील संदीप नानाजी शिरसाठ (वय ३१) व भूषण उर्फ मनोज रमेश शिरसाठ (वय२३) या दोन तरुण शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला तर कृष्णा उत्तम शिरसाठ या तरुणालाही शॉक लागल्याने तो जखमी झाला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की,  दि.७ रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान संदीप शिरसाठ हा विहिरीवरील पाण्याचा विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेला असता स्टार्टरच्या लोखंडी पेटीला विद्युत प्रवाह उतरला असल्याने लोखंडी पेटीला हात लावताच संदीपला शॉक लागला. थोड्या अंतरावर मका पिकाला पाणी देत असलेला भूषण उर्फ मनोज रमेश शिरसाठ (वय२३) याच्या ही बाब लक्षात येताच भूषण त्याच्या मदतीला धावून गेला व  तोही  पेटीला लटकला . हे बघून जवळच असलेल्या कृष्णा उत्तम शिरसाठ हा देखील त्यांच्या मदतीला गेला असता तोही त्यांना लटकला पण सुदैवाने तो शॉक लागताच बाजूला फेकला गेला.

 संदीप शिरसाठ  व भूषण यांना गावातील व आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलवून देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.  देवळा ग्रामीण रुग्णालयात आमदार डॉ. राहुल आहेर आणि  संभाजी आहेर यांनी रुग्णालयात धाव घेत आपल्या परीने सर्व प्रकारे मदत केली. परंतु  संदीप आणि भूषण यांचे प्राण वाचविण्यात अपयश आले. अखेर रुग्णालयातील डॉक्टरांनी  यांना मृत घोषित केले.  जखमी झालेल्या कृष्णा शिरसाठ यांना मालेगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

संदीप शिरसाठ यांचा गेल्या आठ वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. अतिशय गरीब परिस्थितीत कष्ट करून संदीप आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत असत. संदीप शिरसाठ यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील,भाऊ आणि भावजयी असा परिवार आहे. तर भूषण शिरसाठ हा आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.  तो देवळा महाविद्यालयात शिक्षण घेत होता.  या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. दुपारी ३ वाचता दोघांचेही शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता मेशी येथील स्मशानभूमीत दोघांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. 

याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची  नोंद दाखल झाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मातोंडकर, वाघमारे, पोलीस हवालदार धोक्रट, गायकवाड हे करीत आहेत.


ताज्या बातम्या