Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अस्वच्छता ला कंटाळुन सौंदाणे ग्रामस्थांनी जि. प. शाळेला ठोकले टाळे..

दि . 07/02/2020

। मालेगाव । प्रतिनिधी ।
तालुक्यातील सौंदाणे येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेच्या आजूबाजूला व पटांगणावर परिसरातील नागरिक शौचास बसत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणाची स्वच्छता करण्यात यावी अशी वारंवार मागणी करून ही मुख्याध्यापक दुर्लक्ष करित असल्यामुळे संतप्त झालेल्या शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थानी गुरूवारी (दि.६) शाळेला टाळे ठोकत आंदोलन केले.
सौंदाणे येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत गाव व परिसरातील अनेक विद्यार्थी इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घेत आहेत. याच प्राथमिक शाळेच्या परिसरात मोठया प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. परिसरातील ग्रामस्थ या ठिकाणी शौचास बसत असल्याने विद्यार्थ्यांना दुर्गधींचा त्रास सहन करावा लागत आहे. याच आवारात मोकाट डूकरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याच प्रमाणे शाळा आवारातील विद्यार्थ्यांसाठी असलेले स्वच्छतागृह बंद असल्याने विद्यार्थ्याना उघड्यावर जावे लागते. या संदर्भात मुख्याध्यापकांना वेळोवेळी सांगूनही ते या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे संतप्त झालेल्या शालेय व्यवस्थापन समिती सद्स्य व ग्रामस्थांनी अचानक शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या मुख्याध्यापकांनी शाळा परिसराची स्वच्छता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात संदीप पवार, सुरेश पवार, नितीन पवार, दिनकर पवार, गणेश शिरसाठ, दीपक पवार, योगेश पवार, संदीप पवार, किरण पवार आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.


ताज्या बातम्या