Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मंदीमुळे आजपासून पाच दिवस यंत्रमाग व्यवसाय बंद

दि . 05/02/2020

मालेगाव ( प्रतिनिधी ) :- आधीच मंदीच्या दृष्टचक्रात अडकलेला शहरातील यंत्रमाग व्यवसाय पुन्हा कच्चामाल व वीजदरवाढीच्या संकटाने अडचणीत सापडला आहे. त्यामुळे त्रासलेल्या यंत्रमागधारकांच्या विविध संघटनांनी आज बुधवारी दि. ५ पासून ते ९ फेब्रुवारीपर्यंत तब्बल पाच दिवस यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय एका बैठकीत घेतला असून बंद काळात महसूल व वीजकंपनीच्या अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

यंत्रमागाचे मॅचेस्टर समजल्या जाणाऱ्या मालेगावातील यंत्रमाग व्यवसाय गेल्या काही वर्षांपासून मंदीच्या सावटाने डबघाईस आला आहे. येथे तयार होणाऱ्या कापडावर पाली, बालोतरा आदी ठिकाणी प्रक्रिया केली जाते. मात्र तेथील काही युनीटही मंदीमुळे बंद पडल्याचा फटका येथील यंत्रमाग व्यवसायाला बसला आहे. त्यातच डिझेल, पेट्रोलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्चात दहा टक्के वाढ झाल्यामुळे अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे आठवड्यातून दोन दिवस यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय दोन वर्षापूर्वी यंत्रमाग व्यावसायिकांनी घेतला होता.शहरात दोन लाखावर यंत्रमाग असून तीन लाखाहून अधिक मजुरांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. कच्च्या मालाच्या किंमती भरमसाठ वाढल्या असून वर्षभरात विजेची दरवाढही झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला असतांनाच मंदीमुळे कापडाला उठाव नाही. परिणामी उधारीने माल विकावा लागत असून पैसे दोन ते तीन महिन्यानंतर मिळत असल्याने यंत्रमाग व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. एकिकडे यंत्रमागधारकांची गोदामे मालाने भरली आहेत तर दुसरीकडे मंदीमुळे उठाव नसल्याने काही दिवस यंत्रमाग बंद ठेवण्याबाबत या व्यवसायाशी निगडीत सर्व संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक अन्सार जमातखान्यात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक मोहमद इस्माईल मोहमद हारूण होते. या बैठकीत सर्वानुमते दि. ५ ते ९ फेब्रुवारीदरम्यान यंत्रमाग बंद ठेवून महसूल व वीज कंपनी अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी युसूफ इलियास, काजी अन्सारी, अन्वर भिवंडीवाले, मोहम्मद शेख, निहाल दाणेवाले यांनी मनोगत व्यक्त केले.


ताज्या बातम्या