Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सायने येथे खनिकर्म अधिकाऱ्यांच्या पथकावर दगडफेक..

दि . 24/01/2020

मालेगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सायने बुद्रूक येथे गौण खनिज खदानी व खडीक्रशर यंत्राची तपासणी करण्यासाठी आलेल्या जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या पथकावर अवैद्य गौण खनिज वाहतूक करणाऱ्या अज्ञात इसमांनी दगडफेक करीत गौण खनिज वाहतुक करणारे चार ट्रॅक्टर पळवून नेले. या प्रकरणी तलाठी नामदेव श्रावण पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तिविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरालगत असलेल्या सायने एमआयडीसी जवळ खदानी तसेच सायने व चाळीसगाव रस्त्याला खडीक्रशरच्या खानी आहेत. खानकाम आराखडा, रॉयल्टी तसेच या उद्योगामुळे पर्यावरणाची होत असलेली हानी व सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेतली आहे का ?  याबाबत तपासणी करण्यासाठी जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील हे काल गुरुवार दि.२३ रोजी मालेगाव येथे दाखल झाले होते. शहरालगत असलेल्या सायने बुद्रूक येथील गट नंबर २७५ व ३७६ येथील खानपट्टा बघण्यासाठी सायने मंडळ अधिकारी एस. डी. काळे, दाभाडी मंडळ अधिकारी रवी शेवाळे, करंजगव्हाण मंडळ अधिकारी मोरे, मंडळ अधिकारी विधाते यांच्यासह जिल्हा खनिकर्म अधिकारी गेले होते. यावेळी खदानीत पाच ते सहा ट्रॅक्टरद्वारे गौण खनिजाचा उपसा सुरू होता. पाटील व पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे कागदपत्रा संदर्भात चौकशी केली. त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नसल्यामुळे चार ट्रॅक्टरच्या चाव्या ताब्यात घेतल्या. त्यानंतर ते जवळच उभ्या असलेल्या ट्रॅक्टरची चौकशी करीत असतानाच अज्ञात व्यक्तींनी पथकावर दगडफेक सुरू केली. या अचानक झालेल्या दगडफेकीमुळे पथकाला आपला जीव वाचविण्यासाठी पळ काढावा लागला. याच दरम्यान पथकाने ताब्यात घेतलेले चार ट्रॅक्टर देखील अज्ञात इसमांनी पळवून नेले. पाटील यांनी या घटनेची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना दिली. यानंतर तलाठी पवार यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ताज्या बातम्या