Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सीएए व एनआरसी कायद्याची अंमलबजावणी करू नये ; राष्ट्रपतींना निवेदन देणार

दि . 16/01/2020

मालेगाव (प्रतिनिधी) :- बहुमताच्या जोरावर निवडून आलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे नागरिकत्व दुरुस्ती कायदा मंजूर करून देशातील नागरीकांची गळचेपी करीत आहे. संपूर्ण देशात नागरिकत्व नोंदणी प्रक्रिया राबवून या कायद्याच्या अंमलबजावणीची सक्ती पंतप्रधान व गृहमंत्री करीत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार व माजी महापौर रशीद शेख यांनी केली आहे.

रशीद शेख यांनी यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय नेत्यांची भारतीय संविधान सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या वतीने काल बुधवार दि.१५ रोजी येथील उर्दू मीडिया सेंटर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी महापौर आहेरा शेख, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे भगवान आढाव, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे शफीक अहमद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोहम्मद युसुफ मोहम्मद यासीन, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे अन्सारी यूसुफ, मुस्लिम लीगचे अन्सारी लतीफ, काँग्रेस प्रवक्ते साबिर गौर, प्रकाश भावसार आदी उपस्थित होते.

यावेळी शेख यांनी कायद्याची अंमलबजावणी करताना तो कायदा देशातील नागरिकांच्या हिताचा आहे की नाही याचा विचार होणे गरजेचे असल्याचे नमूद करीत आमच्या समितीच्यावतीने राष्ट्रपतींना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यात येऊ नये याविषयी निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले. कायद्यास होत असलेला विरोध लक्षात घेऊन न्यायालयाने देखील जनमताचा आदर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या कायद्याविरोधात २० जानेवारी रोजी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले असून २१ जानेवारीला महापौर ताहेरा शेख यांच्या नेतृत्वात महिलांचे शिष्टमंडळ दिल्ली येथे जाणार असून दिल्लीची शाहीन बाग येथे नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेल्या महिलांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. २२ जानेवारी रोजी काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वात ७० सायकलस्वार विरोधात मालेगाव ते मुंबई सायकल रॅली काढणार आहेत. तसेच २५ जानेवारी रोजी शहरातून मशाल मोर्चा काढण्यात येणार असून त्याचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलाजवळ होईल अशी माहिती यावेळी शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


ताज्या बातम्या