Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
दाभाडी येथील महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांचे नाशिक येथे अनोखे आंदोलन ; किडन्या, डोळे, लिव्हर विक्रीस काढले आहे, असे फलक प्रदर्शित...

दि . 13/01/2020

मालेगाव :- तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दाभाडी येथील शाखेत नागरिकांनी आपली रक्कम ठेवलेली होती. मात्र या खातेदारांच्या खात्यातील  परस्पर गहाळ झालेली रक्कम देण्यास सदर बँक टाळाटाळ करत असल्याने आज खातेदारांनी थेट नाशिक येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोर गडकरी चौकात आंदोलन केले. यावेळी आमचे पैसे परत करा अन्यथा आम्ही आमच्या किडन्या, डोळे, लिव्हर विक्रीस काढले आहे, असे फलक प्रदर्शित केले.

मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र मधील खातेदारांच्या खात्यावरून परस्पर रक्कम काढून तब्बल लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची घटना घडली होती.एका अशिक्षित महिलेच्या खात्यातील पैसे गायब झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर ह्या प्रकरणाला वाचा फुटली होती. बँकेच्या कर्मचाऱ्याकडून व बँक मित्र असलेल्या गणेश सोनवणे याने कुणाच्या हाताचे ठसे घेऊन तर कुणाच्या खोट्या सह्या घेऊन पैसे काढल्याचा हा प्रकार समोर आला होता.

या प्रकरणी खातेदारांनी वेळोवेळी आंदोलन केली तरी देखील बँक प्रशासनाने याची दखल न घेता खातेदारांना नोटिसा देऊन तुम्हीच पैसे काढल्याचा ठपका खातेदारांवर ठेवला. या प्रकरणी खातेदारांनी आज थेट नाशिक येथील महाराष्ट्र बँकेसमोर अनोखे प्रदर्शन करीत पैसे न दिल्यास किडन्या, डोळे विकण्याचा ठेवीदारांनी इशारा दिला. यावेळी 'आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत, तरीही बँक पैसे देत नाही. त्यामुळे, आम्ही आमचा उदरनिर्वाह कसा करायचा? बँक आमचेच पैसे आम्हाला देत नसेल तर, आम्ही कुठे जायचे? असा प्रश्न यावेळी उपस्थित ठेवीदारांनी केला. बँकेने तत्काळ आमचे पैसे परत करावे, अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे.


ताज्या बातम्या