Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
देशांतर्गत शांतता टिकवून ठेवण्यात सीआरपीएफ जवानांचे योगदान महत्वाचे- ना.छगन भुजबळ 

दि . 13/01/2020

मालेगाव,दि.१३ जानेवारी:- अति संवेदनशील ठिकाणी कुठल्याही वेळी शांतता टिकवून ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी सीआरपीएफ जवानांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण असून संरक्षणासाठी आपला देह ठेवलेल्या जवानांना आदरांजली अर्पण करतो असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांनी केले. मालेगाव येथे राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) यांच्या संकुलाच्या उदघाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ना.दादा भुसे, राज्य राखीव पोलीस दलाच्या अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, धुळ्याचे संजय पाटील, मालेगावच्या महापौर ताहिरा शेख यांच्यासह पोलीस अधिकारी व एसआरपीएफचे जवान उपस्थित होते.
यावेळी ना. छगन भुजबळ म्हणाले की, मालेगाव म्हटल्यानंतर संवेदनशील शहर म्हणून ओळख जात याठिकाणी कायमस्वरूपी संरक्षण व्यवस्था निर्माण केली गेली. पोलीस दल नागरिकांच्या संरक्षणासाठी २४ तास सेवा बजावत असते त्यामुळे नागरिक आपले जीवन सुसह्य पणे राहू शकतात. त्यामुळे पोलीस आपली जबाबदारी पार पाडत असतांना त्यांना अन्न, पाणी, निवारा या महत्वाच्या गरजा मिळण्याची आवश्यकता असते. त्या दृष्टीने शासन नेहमीच प्रयत्नशील आहे असे त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, देशाच्या सरंक्षणात पोलिसांची जबाबदारी आहे मात्र त्यांना त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे अशी मागणी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे केली होती. त्यानंतर पोलिस विभागाचे आधुनिकीकरण करण्यात आले.राज्यातील ७० हजार पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीत घेण्यात आली असल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. 

ते म्हणाले की, चांगलं काम केलं तर पोलीस विभागाची बदनामी होणार नाही मात्र कामात कुचराई केली तर विभागाची बदनामी होते त्यामुळे पोलिसांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच शासन चांगलं की वाईट हे पोलिसांच्या कार्यावर अवलंबून असते त्यामुळे आपली जबाबदारी चोख पणे पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्ती आणि घरासाठी पोलीस देणे शक्य नाही त्यामुळे प्रत्येक माणसाच्या मनात पोलीस दडलेला असतो तो जागृत ठेवण ही काळजी गरज आहे.

यावेळी राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री ना.दादा भुसे म्हणाले की, सर्व सुविधा युक्त इमारतीतून जवानांना चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहे याचा आनंद होत आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ज्येष्ठ नेते ना. छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली एसआरपीएफ विभागातील जवानांचे प्रश्न मार्गी लावली जातील.  मालेगाव शहराची प्रतिमा आता विकासाची झाली असून जगात शांततेचा संदेश देणारे शहर बनले आहे. विविध सामाजिक कार्यक्रमात पोलीस बल सहकार्य करेल यात शंका नाही. शासन स्तरावर पोलिसांचे प्रश्न सोडविण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्य राखीव पोलीस दलाच्या अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह  यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


ताज्या बातम्या