Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मनपाच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांचे हाल ; लोकप्रतिनिधींना बुजवावे लागले रस्त्यावरील खड्डे

दि . 13/01/2020

नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवणाऱ्या मालेगाव मनपाकडून लोकप्रतिनिधींच्या तक्रारींचीही दखल घेतली जात नसल्याने त्रस्त लोकप्रतिनिधींवर हातात फावडे घेऊन व स्वखर्चाने खडी मुरूम टाकून रस्ते दुरुस्तीची वेळ आली आहे.प्रभाग क्रमांक ११चे नगरसेवक मदन गायकवाड, भारत बागुल,राजेंद्र शेलार आदींनी सटाणा नाक्यासह प्रभागातील वेगवेगळ्या भागांत हातात फावडे पाट्या घेऊन स्वतः रस्ते दुरुस्ती केली.
        मालेगाव मनपा क्षेत्रात मनपा व पाणी पुरवठा विभागाच्या देखभाल कंत्राटदार यांच्यात बिलांच्या अदायगी वरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. याचा परिणाम कामावर होऊन शहरात जागोजागी पेयजल वाहून डबके साचत आहे.यामुळे शहरातील खड्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. प्रभाग क्र.११ मध्ये समाविष्ट असलेल्या कलेक्टर पट्टा , नवी वस्ती,बोरसे नगर,अयोध्या नगर,स्वप्नपूर्ती नगर आदी भागात मोठ्या प्रमाणात पेयजल वाहून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. याबाबत नागरिकांकडून मनपाकडे नियमितपणे तक्रारींचा पाढा वाचणे सुरू आहे.परंतु मनपाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. नगरसेवकही मनपाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने हतबल झाले आहेत. कोणताच पर्याय दिसत नसल्याने प्रभाग क्र.११चे नगरसेवक मदन गायकवाड,भारत बागुल, राजेंद्र शेलार आदींनी स्वखर्चाने वेगवेगळ्या भागात मुरूम टाकले.एवढेच नव्हे तर तो मुरूम पाट्या फावड्यानी पसरवून त्यांनी स्वतः खड्डे बुजविले.याआधी ही काही दिवसाअगोदर याच नगरसेवकांनी पावसाळ्यात सटाण्या नाक्यावरील पाण्याने भरलेल्या जीवघेण्या  खड्ड्यात बसून आंदोलन केले होते.यंदा त्यांच्यावर फावडे हातात घेऊन खड्डे बुजवण्याची वेळ आली आहे. मनपा प्रशासनाचे असेच धोरण कायम राहिल्यास जनतेला सोबत घेऊन भविष्यात मोठे आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे.


ताज्या बातम्या