Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सोयगाव येथे भरदिवसा घरफोडी ; शहरातील वाढत्या चोऱ्यामुळें नागरिकांमध्ये भितीचे वातावरण..

दि . 01/01/2020

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह...

४ ते ५ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह ३० ते ४० हजार रोख रक्कम लंपास

मालेगाव (प्रतिनिधी) :- शहरातील सोयगाव  भागातील पवन नगर येथे अज्ञात चोरट्यांनी  बुधवार दि. १ भरदिवसा घरफोडी करून लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मालेगाव शहरासह परीसरात चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांकडून गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हान यांच्यासह कॅम्प पोलिस निरीक्षक दिगंबर पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली होती. 

शहरातील सोयगाव भागातील पवन नगर येथे राहणारे सतीश बलराज सुर्यवंशी यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. त्यांच्या पत्नी सुषमा सुर्यवंशी (३२) रा. पवन नगर सोयगाव, मालेगाव या बुधवारी दुपारी १२ वाजेला त्यांच्या मुंगसे येथील शेतात कामानिमित्त गेल्या होत्या तर त्यांची मुलगी क्लासला गेली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी हीच संधी साधून त्यांच्या राहत्या घराच्या मागच्या दरवाजा उघडून घरात प्रवेश करून कपाटात असलेली सुमारे ४ ते ५ लाख रु.किंमतीचे १० ते १२ तोळे सोन्याचे दागिने तसेच ३० ते ४० हजार रु. रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला. 

सुषमा सुर्यवंशी या मुंगसे येथील शेतातील काम आटोपून घरी आल्या असता घराचा मागचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरफोडी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती कॅम्प पोलिसांना मिळताच कॅम्प पोलिस आपल्या पथकासह दाखल झाले. गेल्या काही दिवसात मालेगाव शहर व परिसरात चोरी व घरफोडीचे प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोयगाव भागात दिवसाढवळ्या चोरट्यांनी घरफोडी केल्याने पोलिसांपुढे चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान निर्माण झाले असून शहरात पोलिसांनी गस्त वाढवी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते आहे. रात्री उशिरापर्यंत कॅम्प पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते.


ताज्या बातम्या