Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
बागलाण तालुक्यातील पारनेर येथील खुन प्रकरणातील आरोपीस जन्मठेप

दि . 28/12/2019

मालेगाव (प्रतिनिधी) : - कामावर उशिरा येतो व काम नीट करीत नाही, असा जाब विचारल्याने रागाच्या भरात डोक्यात लोखंडी पहार घालून खून केल्याप्रकरणी आरोपीस येथील अपर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
बागलाण तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील पारनेर शिवारात मार्च २०१६ मध्ये घडलेल्या या खुनाच्या खटल्याचा निकाल काल शुक्रवार दि.२७ रोजी न्यायालयाने दिला.

मार्च २०१६ मध्ये बागलाण तालुक्यातील पारनेर  शिवारातील रघुनाथ देवरे यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम करण्याचा ठेका या प्रकरणातील मयत शंकर किशोर सेन रा. मोटरस ता.बद्नोर जि. भिलवाडा, राजस्थान यांनी घेतला होता. त्यांच्या समवेत कारागीर म्हणून त्यांचा मुलगा मुकेश, आरोपी महेंद्र मिठू भिल (२८) रा. सुतेवाडी ता. बदनोर जि. भिलवाडा, राजस्थान यासह अन्य तीन कारागीर हे विहिरीचे काम सुरु असलेल्या ठिकाणी  झोपडी करून राहत होते. ११ मार्च २०१६ रोजी रात्री मयत शंकर आरोपी महेंद्र व अन्य कारागीर दारू पीत होते. याचवेळी मयत शंकर याने आरोपी महेंद्र यास, "तू कामावर उशिरा येतो, काम नीट करीत नाहीस' असे म्हणत जाब विचारला. याचा राग आल्याने आरोपी महेंद्र याने झोपडीतील लोखंडी पहार आणून मयत शंकर याच्या डोक्यात वार केला. आरोपी महेंद्र यास सोडवण्यासाठी गेलेल्या अन्य साक्षीदारांना देखील त्याने मारहाण केली. यानंतर आरोपी आपल्या पत्नीसह रात्री फरार झाला होता. तर जखमी अवस्थेतील शंकर यास दुस-या दिवशी जायखेडा रुग्नालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले होते. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अशोक नखाते त्यांनी करून आरोपी महेंद्र यास अटक केली होती. तसेच या  प्रकरणी येथील न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अति.सहा. सरकारी वकील संजय सोनवणे यांनी युक्तिवाद केला व एकूण १५ साक्षीदार तपासले. न्यायालयाने शुक्रवार दि.२७ रोजी या प्रकरणी निकाल देत आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.


ताज्या बातम्या