Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अस्वच्छतेमुळे डास व मच्छरांच्या संख्येत वाढ,उपाययोजना करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसाची मागणी..

दि . 28/12/2019

मालेगाव (प्रतिनिधी) :- शहरातील कॅम्प रोड, बाराबंगला, सोयगाव नववसाहत, डिके कॉर्नर आदी भागात डास, मच्छरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येत्या आठ दिवसांत या परिसरात फवारणीसह अन्य उपाययोजना करण्यात याव्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मालेगाव महानगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षातर्फे महापालिका आयुक्त किशोर बोर्डे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

द्याने श्रीरामनगरला जोडणार्‍या फरशी पुलाशेजारी नागरिक उघड्यावर शौचास जातात. त्यामुळे या परिसरात दुर्गधीं पसरली आहे. त्याप्रमाणेच डिके कॉर्नर, सोयगाव नववसाहत भागाबरोबरच आनंदनगर, सोयगाव, मोठाभाऊ नगर भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्यांनी नाल्याचे स्वरुप धारण केले आहे. त्यामुळे याठिकाणी अपघात नित्याचेच झाले आहेत. येथे साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असल्यामुळे तसेच डास व मच्छर यांच्यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कॅम्प रोड व बारा बंगला परिसरातील मालू कॉम्पलेक्स जवळील समर्पण हॉस्पीटलजवळच्या रस्त्यावरील गटारावरचा ढापा तुटला आहे. त्यामुळे याठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. यासर्व ठिकाणी महापालिकेतर्फे कोणत्याही प्रकारची फवारणी केली जात नसल्यामुळे रोगराईच्या प्रमाणात वाढ झाली आहे. येत्या आठ दिवसात फवारणी व उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रायुकॉचे महानगर अध्यक्ष दिनेश ठाकरे, तालुकाध्यक्ष संदिप पवार, अनंत भोसले, सागर पाटील, अनिल पाटील, विजय जगताप, गणेश लोखंडे, त्र्यंबक पाटील, गणपत सोनवणे, प्रशांत बच्छाव, अक्षय दरेकर, मयर खैरनार, निखील अग्रवाल, सचिन शेवाळे, बापूराव पवार, कुणाल कदम, विकी गांगुर्डे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.


ताज्या बातम्या