Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
लेखी आश्वासनानंतर टीडीएफ चे आंदोलनं मागे ..

दि . 26/12/2019

मालेगाव (प्रतिनिधी) :-  शहरातील महापालिका क्षेत्रातील १६५ शाळांमध्ये लागू असलेली सेन्ट्रल किचन योजना रद्द करून बचतगटांना पोषण आहाराचे काम देण्यात यावे या मागणीसाठी सोमवार दि.२३ पासून टीडीएफचे जिल्हाध्यक्ष आर.डी.निकम यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण सुरु केले होते. अखेर मंगळवारी दि.२४ रात्री उशिरा मनपा प्रशासन व निकम यांच्यात झालेल्या चर्चेअंती बचत गटांना पोषण आहाराचा ठेका देण्याबाबत शासनास पत्र देण्यात येईल व शासनाकडून परवानगी मिळाल्यावर पूर्वीप्रमाणेच पोषण आहार योजना सुरु केली जाणार असल्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

सेन्ट्रल किचन योजनेच्या नावाखाली महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा असून अनेक विद्यार्थी यामुळे शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याचा आरोप शिक्षक संघटना, संस्था व शिक्षकांनी केला होता. यामुळे ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे गेल्या दोन महिन्यापासून १६५ शाळातील पोषण आहार बंद असल्याने हजारो विद्यार्थ्यी यापासून वंचित होते. यासंदर्भात महापालिका आयुक्त व उपायुक्त यांच्या भेटीसाठी गेलेल्या टीडीएफ जिल्हाध्यक्ष निकम तसेच मुख्याध्यापक, शिक्षकांना आयुक्तांनी भेट नाकारल्याने आयुक्त व शिक्षकांमध्ये वाद झाले होते. अखेर टीडीएफ संघटनेचे आर.डी.निकम यांच्या नेतृत्वात सेन्ट्रल किचन योजना बंद करून पूर्वीप्रमाणे शालेय पोषण आहार योजना सुरु करावी या मागणीसाठी सोमवार पासून उपोषण सुरु करण्यात आले होते.

दोन दिवसापासून उपोषणकर्ते मागण्यांवर ठाम होते. या उपोषणास शहरातील विविध शैक्षणिक संस्थाचे संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांनी पाठिंबा दिला होता. अखेर मंगळवारी रात्री उशिरा आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस यांनी निकम यांच्या समवेत चर्चा केली. महापालिका क्षेत्रात लागू करण्यात आलेली सेन्ट्रल किचन योजना शासन निर्णयानुसार लागू करण्यात आली आहे. पूर्वीप्रमाणे पोषण आहार योजना लागू करण्याबाबत शासनास पत्र दिले जाईल. शासनाकडून परवानगी मिळाल्यास पूर्वीप्रमाणे आयोजन राबविण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर निकम यांना लिंबू सरबत देऊन उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी चर्चेप्रसंगी संघटनेचे फिरोज बादशहा, प्रा.के.एन.अहिरे, नितीन हिरे, अनिल महाजन, संगीता चव्हान, नितीन ठाकरे, संजय बेलन आदींसह शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते.


ताज्या बातम्या