Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सोमवार बाजार व्यापारी संकुल संदर्भात असलेले उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगिती..

दि . 21/12/2019

सोमवार बाजारातील ओटे व गाळे व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही मालेगावकर समितीचे उपोषण 

महापालिकेच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित

मालेगाव (प्रतिनिधी) :-  शहरातील कॅम्प परिसरातील सोमवार बाजार येथील व्यापारी संकुल गाळे व बाजार ओटे व्यवसायासाठी उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी येथील "आम्ही मालेगावकर" संघर्ष समितीच्या वतीने वेळोवेळी करण्यात येणाऱ्या पाठपुराव्यास महापालिका प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने काल शुक्रवार दि.२० रोजी समितीच्या वतीने येथील प्रभाग १ कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. अखेर या आंदोलनाची दखल घेत महापालिका प्रशासनाने 'संबधित व्यापारी संकुल गाळे व बाजार ओटे भाडे तत्वावर देण्यासाठी दि. २६ डिसेंबर रोजी निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन सदर आंदोलन २७ डिसेंबर पर्यंत स्थगित केले असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

येथील महापालिकेच्या वतीने शहरातील कॅम्प भागातील सोमवार बाजार व्यापारी संकुल व बाजार ओटे केंद्र सरकारच्या विशेष अनुदानातून उभारले आहे. महापालिकेने घालून दिलेल्या अटी शर्तीच्या आधारावर पुढील कायदेशीर बाबींची पूर्तता करून गाळे व्यवसायासाठी अवांटीत करणे आवश्यक होते. मात्र हेतुपुरस्कर महापालिकेकडून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप समितीच्या सदस्यांनी केला. सदर गाळे व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यासाठी समितीच्या वतीने वेळोवेळी धरणे आंदोलन करण्यात आले होते. मात्र महापालिका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची 
अंमलबजावणी होत नसल्यामुळे समितीतर्फे काल आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. या उपोषणात समितीचे निखील पवार, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, शेखर पगार, विशाल पवार, दादा बहिराम, संजय जोशी, गुलाब पगारे, रवींद्र पवार, दिपक भोसले, प्रा.के.एन.अहिरे, श्रीराम सोनवणे, प्रवीण चौधरी, रामदास बोरसे, देवा माळी आदींनी सहभाग घेतला होता.  

 

२७ डिसेंबर पर्यंत उपोषण स्थगित....

"गाळे व बाजार ओटे भाडेतत्वावर देण्यासाठी दि. २६ डिसेंबर रोजी निविदा प्रसिद्ध केली जाईल. तसेच गेल्या १५ वर्ष या प्रक्रियेस विलंब झाल्याने महापालिकेच्या झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत जबाबदारी निश्चित करण्यासाठी सहाय्यक संचालक, नगर रचना विभाग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याचे लेखी आश्वासन उपायुक्त राहुल मर्ढेकर, सहा.उपायुक्त विलास गोसावी, प्रभाग अधिकारी सुनील खडगे यांनी  उपोषणकर्त्यांना दिले. तसेच सध्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली असून त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील उपोषण मागे घेण्याची विनंती केल्याने उपोषण दि.२७ डिसेंबर पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समितीचे निखिल पवार यांनी दिली."


ताज्या बातम्या