Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव येथे संगमेश्वर मशीद ट्रस्ट तर्फे मशीद दर्शन उपक्रम

दि . 16/12/2019

आपला देश हा विविध धर्म, जाती वंशाच्या लोकांनी नटलेला आहे. सांप्रदायिक सदभावना कायम राहवी यासाठी सर्व धर्मांची व त्यांच्या उपासना पध्दती जाणून घेतल्या पाहिजेत. यासाठी संगमेश्‍वर भागातील मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत मशिद दर्शन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात शहरातील विविध धर्माच्या शेकडो बांधवांनी लाभ घेत मशिद दर्शन घेतले.

येथील संगमेश्‍वर मशिद ट्रस्टच्या वतीने काल रविवार दि.१५ रोजी मशिद दर्शन या सद्भावना समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी येणार्‍या प्रत्येक व्यक्तिला मशिद काय आहे, मशिदीत काय असते, मशिदीत मुस्लिम धर्मीय काय करतात, दिवसातून पाच वेळा अजान दिली जाते, त्याचा अर्थ काय. तसेच मशिदीबाबत आपण आजपर्यंत जे ऐकले आहे ते खरे आहे का? या विषयी सखोल माहिती देण्यात आली. यावेळी मशिदीत येणार्‍या प्रत्येक व्यक्तिचे अदबिने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत होते. तसेच मशिदीत प्रवेश कशा पध्दतीने केला जातो. नमाज पठणाच्या आधी शरीर कसे पवित्र केले जाते, वजू करण्याची पध्दत व त्या मागचे कारण याविषयी मालेगाव येथील जावेद इंजिनियर (जाली हाऊस) यांनी महिती दिली. तर एटीटी हायस्कूलचे शिक्षक आसिफ एकबाल यांनी दिवसातून पाच वेळा देण्यात येणार्‍या अजाण विषयी माहिती देत त्याचा अर्थ स्पष्ट केला. तसेच धुळे येथील एलएम सरदार हायस्कुलचे शिक्षक मंजूर अहमद यांनी दिवसातून देण्यात येणार्‍या पाच वेळेच्या नमाज पठणाविषयी माहिती देत नमाज कोणत्या वेळेला देण्यात येते व त्याचे महत्व काय याची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दाखवून येणार्‍या व्यक्तिंचे समाधान केले. 
संवेदनशील व दंगलीचे शहर मानले जाणार्‍या या मालेगाव शहरात संगमेश्‍वर मशिद ट्रस्टतर्फे राबविण्यात येणार्‍या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतूक केले जात आहे. सदर उपक्रमाने एकमेकांना समजून घेण्याची भावना निर्माण होऊन शहराच्या व देशाच्या प्रगतीसाठी एक नवी चालना मिळेल अशी भावना येथील उपस्थित मुस्लिम धर्मगुरुंनी व्यक्त केली. यावेळी राजेंद्र भोसले, नरेंद्र सोनवणे, हरिप्रसाद गुप्ता, राजाराम जाधव, विवेक वारुळे, सुरेश गवळी, सुभाष परदेशी तसेच पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण व शहरातील सामाजिक, शैक्षणिक व राजकिय व्यक्ति तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमास हजेरी लावली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगमेश्‍वर मशिद ट्रस्टचे इमाम हाफिज इम्रान अहमद, ट्रस्टी मुस्ताक अब्दुल हमीद मुल्ला, हाजी जावेद कुरेशी, मुस्ताक अहमद हाजी लैक अहमद, अकिल अहमद जाविद हिमालीया यांच्यासह जावेद इंजिनियर (जाली हाऊस), आसिफ एकबाल, मंजुर अहमद (धुळे), मोहमद सातभाई (धुळे), सरफराज भाई (धुळे), मौलाना मुजाहिद, शकील आझाद, शाहिद कुरेशी, उमर फारुख, डॉ. शकील मेनन, डॉ. कामरान मोहमद, अब्दुल रहेमान इंजिनियर व अल खिदमत ग्रुपचे सदस्य,संगमेश्‍वर मशिद ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, सदस्य व संगमेश्‍वर परिसरातील मुस्लिम बांधव यांनी प्रयत्न केले. 


ताज्या बातम्या