Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नागरिकत्व सुधारणा कायदा, प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदणी मागे घ्यावी - तिस्ता सेतलवाड

दि . 16/12/2019

मालेगाव  :- केंद्र सरकारने देशभरात नागरिकत्व बाबत लागू केलेला कायदा घटनेच्या समानता तत्वाच्या विरोधी आहे. या विधेयकामुळे धार्मिक आधारावरच पुन्हा एकदा भारताची फाळणी करण्याचा हा प्रयत्न आहे. आम्हाला कायदा आणि संविधानाने नागरिकत्व दिलेले आहे. त्याचे रक्षण करण्यासाठी आम्ही शेवटच्या श्‍वासापर्यंत लढणार असून सुधारित नागरिकत्व कायदा २०१९ रद्द करावा तसेच एनआरसीला आमचा विरोध असल्याची माहिती देत सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा, प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदणी मागे घ्यावी. अशी मागणी  सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेतलवाड यांनी केली.

नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणी याविषयी मालेगाव शहरात जनजागृती करण्याच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता काल रविवार दि. १५ रोजी मालेगावी आल्या होत्या. यावेळी येथील उर्दू मिडिया सेंटर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सीसीआय या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अब्दुल मजीद सिद्दिकी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तिस्ता म्हणाल्या की, नागरिकत्व सुधारणा कायदा मुस्लिमेतर धार्मिक प्रतारीत अल्पसंख्याक धर्मियांना नागरिकत्व देतो. परंतु नेपाळ , म्यानमार किंवा श्रीलंका देशातील धार्मिक प्रतारीत मुस्लिमांबाबत सरकारचा दृष्टीकोन मानवतावादी का नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लोकांमध्ये कॅब तसेच एनआरसी बाबत भीतीचे भयाचे वातावरण आहे. परंतु लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही नागरिकत्व हा आपला मुलभूत हक्क असून तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. यासंदर्भात न्यायालयात जाणार असून सामाजिक संस्था व विरोधी पक्षांना सोबत घेणार असल्याचे त्या म्हणाल्या. कम्युनिटी कॉर्डीनेशन इनिशेटीव या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राज्यभरात एनआरसी व कॅब बाबत जनजागृती केली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 


ताज्या बातम्या