Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
लुटमार करून खून करणाऱ्या तिघांना चार तासात अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

दि . 09/12/2019

मालेगाव (प्रतिनिधी) :- मोबाईल व पैसे बळजबरीने हिसकावण्याच्या प्रयत्न करणाऱ्या तिघांना प्रतिकार करणाऱ्या गोरख नामदेव जाधव रा. गिगाव या ५० वर्षीय इसमाचा झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चार तासात तिघांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून दुचाकीसह ११ चोरीचे मोबाईल जप्त केले.

येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाट्याजवळ सदर प्रकार घडला. शहबाज अंजुम मेहमूद (२०) रा.हकीम नगर,  नूर अमीन नियाज अहमद उर्फ सोनू (२२) व मोहम्मद युसूफ याकुब उर्फ युसुफ भुर्‍या (२३) रा.पवारवाडी, असे या तिघा संशयीतांची नावे असून हे तिघे विना नंबरच्या दुचाकीने फिरून चाकुचा धाक दाखवून बळजबरीने चोरी करीत होते. जाधव यांच्यावर केलेल्या हल्ल्या आधी या तिघांनी परिसरात दोन इसमांना चाकुचा धाक दाखवून व मारहाण करुन मोबाईल व रोख रक्कम बळजबरीने लुटुन नेली होती. त्यानंतर या तिघांनी चाळीसगाव फाट्यावर असलेल्या आर.आर.केमिकल्स उद्योग चाळीसगाव फाटा या कंम्पाउंडजवळ उभे असणारे गोरख नामदेव यांना चाकुचा धाक दाखवत त्यांच्याकडील पैसे व मोबाईल चोरीचा प्रयत्न केला. यावेळी जाधव यांनी प्रतिकार केल्यामुळे संतप्त झालेल्या तिघांनी त्यांच्या छातीवर तिक्ष्ण हत्याराने वार केले. गंभीर जखमी झालेल्या जाधव यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरविली. दरम्यान सदर गुन्हेगार हे शहरातील हकीम नगर परिसरात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथका स मिळाली. त्यानुसार पथकाने हकीम नगर परिसरात सापळा रचून अवघ्या चार तासातच या तिघांना अटक केली. "आम्ही मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला, परंतु जाधव यांनी तीव्र प्रतिकार केला. त्यामुळे संतापात केलेल्या हल्ल्यात जाधव यांचा मृत्यू झाल्याची कबुली चोरट्यांनी दिली आहे. त्यांच्या ताब्यातून विना नंबरच्या दुचाकीसह ११ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक आरती सिंग व अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील, सहायक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील अहिरे, सुहास छत्रे, राकेश उबाळे, देवा गोविंद, चेतन संवत्सरकर, फिरोज पठाण, रतीलाल वाघ, संदीप लगड, हेमंत गिलबीले, प्रदीप बहिरम, दत्ता माळी आदींनी सदर कारवाई केली.


ताज्या बातम्या