Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अवकाळीच्या फटक्यानंतर आर्थिक दिलासा;१४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग..

दि . 26/11/2019

तालुक्यात गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील सर्वच प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ऐन दिवाळीच्या तोंडावर काढणीला आलेले पिक वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडले होते. अखेर राज्यपालांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली होती. या मदतीचा पहिला टप्पा आला असून, तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी २९ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातील १४ कोटी रुपये १४ हजार ३९० खातेदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यासाठी बँककडे देण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी दिली. उर्वरित निधी देखील लवकरच वर्ग करण्यात येणार आहे.

अवकाळी पावसामुळे खरिपातील बाजरी, मका, कपाशी, तूर आदीपिकांसह फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यात १ लाख १३ हजार ८०१ शेतकऱ्यांचे १ लाख १४ हजार ९४३ हेक्टरला फटका बसला होता. महसूल विभागाने या बाधित क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे करून १०३ कोटी रुपयांचा नुकसानीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार राज्य शासनाने संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात १८१ कोटी ५० लाख ८४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून सर्वाधिक २९ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी मालेगाव तालुक्याला प्राप्त झाला आहे. प्राप्त नुकसानभरपाई तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदार राजपूत यांनी केल्या होत्या. त्यानुसार महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या याद्यानुसार त्यांच्या बँक खात्यात हे पैसे वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. बँकनिहाय खातेदार शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून ही नुकसानभरपाई बँककडे वर्ग करण्यात येते आहे. प्राप्त आर्थिक मदतीपैकी तालुक्यातील १४ हजार ३९० खातेदार शेतकऱ्यांसाठी १४ कोटी रुपये बँकेकडे वर्ग केले असून उर्वरित रक्कम देखील लवकरच वर्ग होईल अशी माहिती राजपूत यांनी दिली.

नुकसानग्रस्त शेतकरी - १ लाख १३ हजार ८०१

नुकसानीचे क्षेत्र - १ लाख १४ हजार ९४३ हेक्टर

नुकसानीचा प्रस्ताव - सुमारे १०३ कोटी रु.

प्राप्त नुकसानभरपाई - २९ कोटी ५४ लाख रु.

रक्कम वर्ग - १४ कोटी रु.

खातेदार शेतकरी - १४ हजार ३९०


ताज्या बातम्या