Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावातील खड्ड्यांच्या दुखण्यावर तीन कोटींचे मलम..

दि . 15/11/2019

मालेगाव: सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणाऱ्या आणि त्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या खड्ड्यांची समस्या झोपेचे सोंग घेणाऱ्या महापालिकेला अखेर दिसली असून, शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी पालिका प्रशासनाने ३ कोटी ७० लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. रस्ते दुरुस्तीसाठी लागणारा अतिरिक्त १ कोटी ७० लाख निधीची तरतूद करण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिली. त्यामुळे पालिकेच्या ३ कोटी निधीतून तरी खड्डेमय रस्त्यांपासून नागरिकांची सुटका होईल, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.

शहरात दरवर्षी रस्त्यांवरील खड्डे व त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या हा टीकेचा विषय होतो. यंदा तर पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने शहरातील रस्त्यांचे कामांची चांगलीच पोलखोल केली. शहरातील प्रमुख जुना आग्रा रोड, कॅम्प, सटाणा, दरेगाव, साठफुटी रोडसह अंतर्गत रस्त्यांची स्थिती अत्यंत भयावह झाली असल्याने अपघात होणे, पाठीचे व मणक्यांचे आजार अशा समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागते आहे. शहरातील खड्ड्यांचा समस्यांवर प्रकाश टाकणारे 'सावधान! पुढे खड्डा आहे' या मथळ्याचे वृत्त मटाने प्रकाशित केले होते. अखेर पालिका प्रशासनाने या खड्डेमय रस्त्यांकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी निधीची तरतूद मात्र अपुरी पडत असल्याने अखेर महासभेपुढे अतिरिक्त निधीची तरतूद करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.

पालिकेच्या अदांजपत्रकात रस्ते दुरुस्तीसाठी वार्षिक २ कोटीची तरतूद असून ती अपूर्णच आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी किमान ३ कोटी ७० लाखाचा खर्च पालिकेला अपेक्षित आहे. विकास आराखड्यातील ४८ पैकी ७ रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मंजूर आहेत. उर्वरित ४१ रस्त्यांसाठी हा अपेक्षित खर्च उभा करण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. यात प्रभाग १ साठी ९२ लाख, प्रभाग २ साठी ८२ लाख, प्रभाग ३ साठी १ कोटी ७ लाख तर प्रभाग ४ साठी ८९ लाख इतका निधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या महासभेत हा प्रस्ताव मंजूर व्हावा आणि शहारातील रस्त्यांचे भाग्य उजळावे अशीच अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

हे रस्ते होणार खड्डेमुक्त

गिरणा नदी-चर्च सोयगाव, सोमवार बाजार, टेहरे चौफुली ते सटाणा नाका, मोसमपूल ते गिरणापूल, डि.के. ते रेस्ट हाउस, गवळी वाडा-हिम्मत नगर-मोची कॉर्नर-मोसमपूल, दाभाडी रोड, साठफुटी रोड, सोमवार बाजार ते भायगाव, सबस्टेशन रोड, एम. जी. रोड.

 


ताज्या बातम्या