Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
वादग्रस्त जागा रामलल्लाचीच; मुस्लिमांना पर्यायी जागा देण्याचा निर्णय..

दि . 09/11/2019

अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी सप्टेंबर २०१० मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने दिलेल्या निकालानंतर आज सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचे सुप्रीम कोर्टाने मान्य केले आहे. तसेच अयोध्येतच सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर पर्यायी जागा देण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारने ३-४ महिन्यात ट्रस्ट स्थापन करावे, असा आदेश कोर्टाने दिला आहे. 

रामलल्लाचे कायदेशीर अस्तित्व कोर्टाने मान्य केले आहे. रामजन्मभूमी व्यक्ती नाही. पण भारतीय पुरातत्व विभागाने काढलेल्या निष्कर्षाकडे दुर्लक्ष करता येत नाही. बाबरी मशिद रिकाम्या जागी बांधली गेली नाही. मशिदीखाली हिंदू मंदिरासारखी संरचना होती, गाडल्या गेलेल्या अवशेषांमध्ये मंदिराचे अवशेष सापडल्याचा पुरातत्व खात्याचा निष्कर्ष सुप्रीम कोर्टाने मान्य केला आहे. चौथरा, सीता की रसोई यांचे अस्तित्व देखील मान्य करण्यात आले आहे.

प्रभू रामाचा जन्म अयोध्येत झाला होता, अशी हिंदूची श्रद्धा आहे. यासाठी हिंदू पक्षकारांनी पुरातन काळातील दस्तावेजांचे दाखल दिले होते. ते कोर्टाने मान्य केले आहे. 

संपूर्ण देशच नव्हे तर जगाचेही लक्ष लागून असलेल्या अयोध्या खटल्याचा निकाल आज सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला. शनिवारी सकाळी १०.३० वाजल्यापासून निकालाचे वाचन करण्यात आले. सलग ४० दिवस चाललेल्या मॅरेथॉन सुनावणीनंतर सरन्यायाधीशांनी निकाल गेल्या १६ ऑक्टोबर रोजी राखून ठेवला होता. हा निकाल काय असेल याबद्दल जगभर उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अखेर आज हा निकाल जाहीर करण्यात आला. 

या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्य न्यायालयाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अयोध्येत १० डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून देशवासियांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

या निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशसह सर्व राज्यांत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


ताज्या बातम्या