Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
आता प्रतिक्षा निकालाची; जिल्ह्यात ६०.१३ टक्के मतदान..

दि . 22/10/2019

 जिल्हयातील 15 विधानसभा मतदारसंघासाठी काल घेण्यात आलेल्या निवडणुकीत एकुण अंदाजे  60.13 टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे. यंदा निवडणुकीत सर्वाधिक मतदान होईल अशी अटकळ बांधली जात होती मात्र अपेक्षेपेक्षा अतिशय कमी मतदान झाल्याने त्याचा फायदा कुणाला आणि त्याचा फटका कोणाला बसेल हे सांगणे अवघड असून येत्या दि. 24 रोजी मतमोजणी झाल्यानंतर कुणाच्या गळयात आमदारकीची माळ पडेल हे कळणार आहे.

त्यामुळे आता उमेदवारांसह राजकीय पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, त्यांचे समर्थक आणि हितचिंतक तसेच मतदारांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी यंदा प्रथमच सोशलमिडियाचा वापर सर्वाधिक झाला होता. त्याचा फायदा मतदानाची टक्केवारी वाढण्यावर होईल असा अंदाज होता. जवळपास 45 लाखांच्यावर मतदार असतांना मतदान घटणे यातून मतदारांची उदासिनता दिसून येते. शहरासह जिल्हयात पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव दल, गुजरात आणि पश्चिम बंगालमधून आलेल्या सुरक्षा दलाचा समावेश आहे.

मालेगाव आणि अन्य संवेदनशील ठिकाणी मतदान केंद्र परिसरात ड्रोनद्वारे टेहळणी करण्यात आली. यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडल्याची घटना नोंद झाली नाही. सर्वाधिक मतदान  73.68 टक्के हे निफाडला झाले तर सर्वात कमी नाशिक पूर्वमध्ये 47.17 टक्के झाले आहे.
मतदारसंघाची नावे आणि झालेले मतदान हे टक्केवारीत कंसात -

नांदगाव (51), मालेगाव मध्य (67), मालेगाव बाहय (55.11), बागलाण (58), कळवण (67.82), चांदवड (66.43), येवला (65.77), सिन्नर (60.08), निफाड (73.68), दिंडोरी (69.68), नाशिक पूर्व (47.17), नाशिक मध्य (55.20), नाशिक पश्चिम (54.20), देवळाली (56.05), इगतपुरी (62.40) इतके टक्के मतदान झाले आहे. एकुण 45 लाख मतदारांपैकी जवळपास 60.13 टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे. या सर्वच 15 विधानसभा मतदानसंघात सकाळी मतदारांचा निरूत्साह दिसून आला. त्यानंतर दुपारी 2 वाजता काही ठिकाणी तर काही ठिकाणी दुपारी 3 वाजेनंतर मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली असल्याचे दिसून आले. तर सर्वच ठिकाणी सांयकाळी 5 वाजेनंतर अधिक गर्दी वाढली होती.

काही ठिकाणी सहा वाजेनंतरही मतदान प्रक्रिया सुरूच होती. एकदम मतदारांनी गर्दी केल्याने सांयकाळी 6 वाजेच्या आधी आलेल्यांना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर मात्र मतदान केंद्रांचे प्रवेशद्वार बंद करण्यात आल्यानंतर आलेल्या सर्वांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी अधिक मतदान होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्वाधिक प्रचार यंत्रणा राबविण्यात आली होती. तर सर्वच पक्षांच्या दिग्गजांनी सभा घेत वातावरण निर्मिती केली होती. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, माकप, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आदी राजकीय पक्षांच्या उमेदवारांसहीत अपक्ष आणि बंडखोरांनी निवडणुक लढविली. 148 उमेदवारांनी आपले नशिब अजमावले असून येत्या दि.24 रोजी मतमोजणीतच त्यांच्या भविष्याचा फैसला होणार आहे.


ताज्या बातम्या