Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव बाजार समितीच्या व्यापाऱ्याकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचे दाम मांगो आंदोलन...

दि . 26/08/2019

मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रात कांदा व्यापाऱ्याकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि कांदा उत्पादक शेतकरी आंदोलक समितीने रविवारी शहरानजीक चाळीसगाव फाटा येथे दाम मांगो आंदोलन केले.

एक वर्षांपूर्वी मुंगसे येथील कांदा व्यापाऱ्याने तालुक्यातील सहाशेहून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. ज्यात बाजार समितीने मध्यस्थी करून शेतकऱ्यांच्या कांदा विक्रीचे दोन कोटी २१ लाख रुपयांपैकी फक्त ७२ लाख रुपये देऊन बोळवण केली. तसेच फसवणूक करून पूर्ण रक्कम मिळाली, असा मजकूर असलेल्या पावल्यांवर शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन छेडले आहे.

शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा उप-निबंधकांना शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत, असे प्रतिज्ञापत्र सादर केले. एक दिवसीय धरणे आंदोलन देखील केले. त्यानंतर फ्लेक्स चोरी प्रकरणी गावोगावी आंदोलन करण्याचा संकल्प करण्यात आला. याचा शुभारंभ दाभाडी गावातून करण्यात आला. रविवारी चाळीसगाव फाटा येथे सकाळी ९ वाजता 'दाम मांगो' सभा झाली. यावेळी सायणे, शेंदुर्णी, रोझे, माल्हणगाव, दसाणे, लोणवाडे, चिखलओहोळ गावातील बाधित शेतकरी उपस्थित होते. या प्रसंगी पत्रक वाटप करून जनजागृती करण्यात आली. तसेच पैसे मागणीचा फ्लेक्सचेही अनावरण करण्यात आले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस महानगराध्यक्ष दिनेश ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. सोमनाथ चव्हाण, सतीश जगताप, शिवदास उशिरे आदी शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी मालेगाव मनपाचे नगरसेवक धर्मा अण्णा भामरे, नंदू सावंत, किशोर इंगळे, नीलेश पाटील आदींसह फसवणूक झालेले शेतकरी उपस्थित होते.

म्हणून सुरू झाले आंदोलन

शेतकऱ्यांना पैसे परत मिळावे यासाठी पैसे मागणीचा फ्लेक्स बाजार समितीच्या दारावर लावला. परंतु तो रातोरात चोरीस गेला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली. त्यामुळे पैसे मागणी फ्लेक्सच्या चोरीचा पर्दाफाश गावोगावी करावा, असा संकल्प करण्यात आला.


ताज्या बातम्या