Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
विशेष पोलीस पथकाने पकडली टँकर मधली चोरी पण साखळी कधी सापडणार?

दि . 22/08/2019

मनमाड येथील पानेवाडी प्रकल्पातून निघालेल्या टँकरमधून परस्पर डिझेल काढून विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला. येथील अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्तवाखाली उपअधीक्षक शशिकांत शिंदे, उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण आदींसह पथकाने मालेगाव-मनमाड रोडवरील एका हॉटेलवर छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईमुळे पानेवाडी प्रकल्पातून निघाणाऱ्या टँकरमधून इंधन चोरीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मालेगाव तालुका पोलिस ठाणे हद्दीत हा गुन्हा घडला.

मालेगाव-मनमाड रोडवरील वऱ्हाणे शिवारातील हॉटेल शांतीवंदन येथे बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही डिझेल चोरी सुरू असताना पोलिसांनी छापा टाकला. यावेळी हॉटेलच्या पाठीमागे टँकरचालक रमेश विठ्ठल खरे (वय ६३, रा. मनमाड ता. नांदगाव ), क्लिनर हैदर इमाम तांबोळी (वय ५५, रा. ५२ नंबर, मनमाड ता. नांदगाव) हे दोघे त्यांच्या ताब्यातील टँकर (एमएच ३७ बी ०५४७) मधून डिझेल काढताना आढळले. या कामात त्यांना हॉटेल शांतीवंदनचा कामगार गोविंद साहेबराव शिरसाठ (वय ३६, रा. कलेक्टरपट्टा, मालेगाव) हा घटनास्थळी मदत करीत होता. पानेवाडीतून निघालेले हे डिझेल टँकर मालेगावातील जुना आग्रा रोड वरील एम. जी. आगरकर या पेट्रोल पंपावर जाणार होते. पोलिसांनी टँकर चालक, क्लिनर व हॉटेल मधील कामगार या तिघांना अटक केली असून हॉटेल मालक शांतीलाल पवार (रा. वऱ्हाणे ता. मालेगाव) फरार आहे. या कारवाईत एकूण १६ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरोधात मालेगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिस शिपाई अभिजित साबळे, दिनेश शेरावते, मिलिंद पवार आदींचा समावेश होता.

साखळी कधी सापडणार?

पानेवाडी येथून दररोज शेकडो टँकर राज्यातील विविध पेट्रोल पंपावर डिझेल, पेट्रोल घेवून रवाना होतात. हे टँकर प्रवासात अनेक हॉटेल्य, ढाब्यांचे बाहेर थांबलेले दिसतात. टँकर थांबलेले असताना अनेकदा काही व्यक्तींकडून संशायस्पद हालचालीदेखील टिपल्या जातात. मात्र याबाबत पोलिसांना कोणीही ठोस माहिती देत नसल्यामुळे हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. डिझेल चोरीमागे मोठी साखळी असून, त्यातील मुख्य आरोपींना पोलिस कधी पकडतात, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.


ताज्या बातम्या