Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
दाभाडीत स्वातंत्र्यदिनी उपोषण; सरपंच यांचा मनमानी कारभार व भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी..

दि . 16/08/2019

स्वातंत्र्यदिनी दाभाडी जि प सदस्य व ग्रामपालिका सदस्यांचे उपोषण

दाभाडी - मालेगाव तालुक्यातील दाभाडी गावातून थेट निवडून आलेल्या सरपंच चारुशीला अमोल निकम या मनमानी कारभार करीत असून त्यांनी केलेल्या कामात भष्ट्राचार केल्याचा आरोप करत सदर बाबींची चौकशी होऊन कार्यवाही व्हावी साठी दाभाडीच्या जिल्हा परिषद सदस्या संगिता निकम यांच्या नेतृत्वात उपसरपंचासह 13 सदस्यांनी ग्रामपालिका कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनी लाक्षणिक उपोषण केले.
            नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्हा परिषद सदस्यासह ग्रामपालिका सदस्यांनी दिनांक 29 जुलै रोजी प्रत्यक्ष भेटून निवेदने सादर केलेली होती. मात्र त्यावर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने तक्रारदार सदस्यांनी सूचित केल्याप्रमाणे स्वातंत्र्यदिनी ग्रामपालिका कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करत सरपंच निकम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरपंच निकम या मनमानी कारभार करतात, कामकाज करतांना सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, ते स्वतः कारभार न पाहता त्यांचे पती व सासरे कामकाज करतात, स्वच्छ भारत अभियान अंर्तगत मंजूर शौचालय अनुदानामध्ये भ्रष्टाचार केला असून शौचालयांची कामे अपूर्ण असतांना निधी काढण्यात आला आहे, शौचालय लाभार्थ्यांकडून जादाची रक्कम घेण्यात आली आहे. स्मशानभूमी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. मराठी शाळेचे पत्रे बसवणे व बाजारपेठत पेलव्हर ब्लॉक बसवणे या कामांची इ निविदा सभागृहात प्रसिद्ध न करता सदर काम मिटिंग मध्ये मंजूर न करता आधीच सुरू करण्यात आले आहे. अपंग राखीव निधी योग्य पद्धतीने खर्च करण्यात आलेला नाही, पदाचा गैरवापर करून स्वतःच्या शेताकडे रस्ता बनविणे, स्वतःच्या शेताजवळ जलयुक्त शिवार अंतर्गत बंधारा बांधणे सदर कामातून निघालेले गौण खनिज स्वतः वापरणे, त्याचा सरकारी कर न भरणे अशा अनेक तक्रारींची चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
            उपोषणास मालेगावचे तहसीदार सी आर राजपूत यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांचे म्हणणे जाणून घेतले. यावेळी सर्कल अधिकारी रवींद्र शेवाळे, तलाठी पी पी मोरे, ग्रामविस्तार अधिकारी एस एस महाले, ग्रामसेवक भास्कर पाटील उपस्थित होते. उपोषणास जिल्हा परिषद सदस्या संगीता निकम, उपसरपंच सुभाष नहिरे, ग्रामपालिका सदस्य अविनाश निकम, प्रशांत निकम, शरद देवरे, दादाजी सुपारे, विशाल निकम, हिरामण गायकवाड, संगीता किशोर निकम, भावना निकम, आशाबाई निकम, विद्या निकम, सोनाली निकम, सुरेखा मानकर यांसह प्रमोद निकम, बाजार समिती संचालक संजय निकम, शेतकी संघ संचालक किशोर निकम, अंबु निकम, नीलकंठ निकम, डॉ एस के पाटील, बापू निकम आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते तर तीनशेहुन अधिक नागरिकांनी उपोषणास भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.

प्रतिक्रिया - सरपंच चारुशीला निकम या स्वतः कारभार न पाहता त्यांचे पती व सासरे कामकाज करतात, त्यांनी मागील दोन वर्षात केलेली कामे अत्यंत निकृष्ट असून त्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे - संगिता निकम, जिल्हा परिषद सदस्या

प्रतिक्रिया - सरपंच यांच्या गैरकारभारविरुद्ध उपोषण करण्यात आले आहे, यावर कार्यवाही न झाल्यास पुढील काळात मोठे आंदोलन केले जाईल - भावना निकम, ग्रामपालिका सदस्या

 


ताज्या बातम्या