Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
इम्तियाज जलील यांची खासदारकी धोक्यात?

दि . 08/07/2019

एमआयएम पक्षाचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले उमेदवार खासदार इम्तियाज जलील यांच्या निवडीला आव्हान देणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आली आहे. खासदार जलील यांची निवडणूक रद्द करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूकीतील बहुजन महापार्टी या पक्षातर्फे निवडणूक लढविलेले उमेदवार शेख नदीम शेख करीम यांनी ऍड. सिद्धेश्‍वर ठोंबरे यांच्यातर्फे ही याचिका सादर केली आहे. याचिकेमध्ये इम्तियाज जलील यांची निवडणूक रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. याचिकेत निवडणूक आयोग, खासदार इम्तियाज जलील यांच्यासह निवडणुकीतील सर्वच उमेदवारांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

काय आहे याचिकेत 
- इम्तियाज जलील निवडणूक लढवित असलेल्या एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी निवडणूकीच्या प्रचारादरम्यान हिंदू-मुस्लीम धर्मात तेढ निर्माण होईल अशी भाषणे केली.

- याचिकेसोबत भडकावणाऱ्या काही छायाचित्रीकरणाच्या सीडीज सादर केल्या, निवडणूकीदरम्यान मशीदींमधूनही प्रचार केला असल्याची छायाचित्रेही सादर करण्यात आली. त्यांनी मुस्लिम तसेच दलितांच्या नावावर मते मागितल्याचेही म्हटले आहे.

- निवडणूक नियम 1961 चे नियम 87 नुसार निवडणुकीचा खर्च करण्यासाठी वेगळे बॅंक खाते उघडून त्यातूनच सर्व प्रकरचा खर्च करावा लागतो. मात्र जलील यांनी निवडणुकीदरम्यान 82 हजार रुपये रोख खर्च केला.

- तसेच एका अल्पवयीन मुलाची सीडी तयार करून ती मतदाना आधी सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली. ही सीडी आफताब खान याने बनविली असून, तो एमआयएमचा कार्यकर्ता आहे. या सीडीमध्ये एमआयएमला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याशिवाय यामध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल असे भडकविणारे वक्तव्ये, तसेच अश्‍लाघ्य भाषाही वापरण्यात आली होती.

(सकाळ)


ताज्या बातम्या