Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
आठ जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची नियुक्ती

दि . 06/07/2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ जिल्ह्यांसाठी गुरुवारी पालकमंत्र्यांची नियुक्ती केली असून, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जागी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी वित्तमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांची गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.
अमरावती, पालघर, भंडारा, गोंदिया, हिंगोली, वर्धा, बुलढाणा आणि गडचिरोली या आठजिल्ह्यांचे पालकमंत्री नियुक्त करण्यात आले आहेत. कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची अमरावतीचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी या जिल्ह्याची जबाबदारी माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडे होती. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पालघरची जबाबदारी सोपवली आहे. माजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे या जिल्ह्याची जबाबदारी होती. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेल्या दोन लोकसभा निवडणुकीची जबाबदारी यशस्वीपणे हाताळल्याने आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याकडे पालघरची जबाबदारी देण्यात आली आहे. उद्योग, खनिकर्म, तसेच अल्पसंख्याक कल्याण राज्यमंत्री अतुल सावे यांची हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांच्याकडे त्यांच्याच, बुलढाणा जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

(म.टा)

 


ताज्या बातम्या