Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
बिजोटेतील करंजाडी नदीवरील पुलावरील गज उखडले..

दि . 05/07/2019

बिजोटे (ता.बागलाण) येथील करंजाडी नदीवरील पुलावरील टाकलेला स्लॅब अतिशय निकृष्ठ पद्धतीने असल्याने काही महिन्यांतच लोखंडी गज बाहेर निघाले आहेत. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी या पुलावर वृक्ष लागवडही केली होती. मात्र संबधित विभागाने डोळेझाक केल्याने पुन्हा प्रशासनाला जाग यावी यासाठी नागरीकांनी पुलावर येऊन काही तास ठिय्या मांडत बांधकाम विभागाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

 

 गावाजवळील करंजाडी नदीवरील पुलावर संबधित ठेकेदाराने स्लॅबचे काम अतिशय निकृष्ठ पद्धतीने केल्याने काही कालावधीतच स्लॅबचे गज उघडे पडले आहेत. या पुलावरून आखतवाडे शिवार, गोराणे, अमरावतीपाडे, दोधेश्वर, भाक्षी, जायखेडा परिसरातील शेतक-यांसाठी भाजीपाला व अन्य वाहतुकीसाठी सोयीस्कर असल्याने रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. पुलावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते आहे. काही महिन्यांपूर्वी याच पुलावर एका ठेकेदारामार्फत नव्याने स्लॅबचे काम करण्यात आले होते, मात्र काही कालावधीतच गज बाहेर आल्याने वाहनांचे अतोनात नुकसान होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी काही महिन्यांपूर्वी वृक्ष लागवड केली होती. मात्र संबधित विभागाने नागरिकांना केराची टोपली दाखली एकही अधिकारी या पुलाच्या कामावर फिरकला नाही. संबधित विभाग जाणूनबूजून लक्ष घालत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक वाहनांचे टायर उघड्या गजांमुळे निकामी झाले असल्याचे शेतक-यांनी सांगितले. पुलाच्या निकृष्ठ कामाची सखोल चौकशी करून पुलाची दुरूस्ती करण्यात यावी यासाठी ग्रामपंचायत उपसरपंच बळीराम जाधव यांच्यासह नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पुन्हा पुलावर जाऊन ठिय्या मांडत बांधकाम विभागाच्या विरोधात घोषणाबाजी केली. आता तरी संबधित विभागाला मुहूर्त सापडेल व काम होईल अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. यावेळी उपसरपंच बळीराम जाधव, दिलीप जाधव, किशोर जाधव, प्रभाकर जाधव, विश्वास जाधव, जयवंत जाधव, दिपक जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


ताज्या बातम्या